पाणीयोजनेचे साडेतीन कोटीच मिळणार
जिल्ह्य़ातील ग्रापंचायतींकडे असलेल्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांची विज बिलाची थकबाकी साडेअठरा कोटी रुपये आहे, सरकारने दुष्काळामुळे ६७ टक्के वीज सवलत जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ही सवलत नगर जिल्ह्य़ास साडेतीन कोटी रुपयांवरच मिळणार आहे. त्यामुळे या सवलत योजनेचा जिल्ह्य़ास फारसा लाभ मिळणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. दरम्यान जिल्ह्य़ातील २१९ पाणी योजना उद्भव कोरडे पडल्याने बंद पडल्या आहेत. तसेच दुष्काळामुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा विज पुरवठा थकबाकीच्या कारणावरुन तोडु नये असा आदेश सरकारने दिला असला तरी ३ योजनांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्य़ातील १ हजार ४४६ स्वतंत्र पाणी योजनांपैकी २४६ योजना बंद आहेत, त्यातील २१९ योजना उद्भव कोरडे पडल्याने बंद झाल्या आहेत, या बहुतांशी जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील आहेत. कुरणवाडी (राहुरी), शेवगाव व शहरटाकळी, तळेगाव (संगमनेर) या तीन प्रादेशिक योजना थकबाकीच्या कारणावरुन वीज पुरवठा खंडित केल्याने बंद आहेत.
दुष्काळामुळे थकित वीज बीलाच्या ३३ टक्के रक्कम जमा केल्यास ६७ टक्के सवलत देण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. परंतु ही सवलत सरकारने एप्रिल २०१२ पासुन लागु केली आहे. स्वतंत्र पाणी योजनांची एकुण थकबाकी सुमारे साडेअठरा कोटी आहे, एप्रिल २०१२ पासुन या योजनांची थकबाकी एकुण साडेतीन कोटी रुपये आहे. त्यामुळे जी सवलत मिळणार आहे ती साडेतीन कोटीपैकी ३३ टक्के रक्कम भरल्यास. याशिवाय एकुण ४१ प्रादेशिक योजनांकडे सुमारे साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सवलत योजनेचा जिल्ह्य़ास फारसा लाभ मिळणार नाही. शिवाय वीज बिलाअभावी या योजना बंद झाल्यास तेथे टँकर पुरवठा करणेही शक्य होणार नाही. कारण पाणी योजना कायान्वित असल्याने तेथे नियमानुसार टँकर देता येणार नाही.