उत्तर भारतात पावसाने घातलेल्या थैमानात मराठवाडय़ातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या ३३९ यात्रेकरूंपैकी २०२ यात्रेकरूंचा अजूनही संपर्क होऊ शकला नाही. कोणत्या खासगी वाहनाने यात्रेसाठी किती लोक गेले आहेत, याचा जिल्हानिहाय आढावा विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत बुधवारी घेण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत संपर्काचे प्रयत्न सुरू असले, तरी आतापर्यंत १३७ जण सुरक्षित असल्याची माहिती मिळू शकली. उर्वरित यात्रेकरूंशी संपर्क व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी मराठवाडय़ातून ३३९ लोक गेल्याची आकडेवारी आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातून १०५ जण यात्रेत सहभागी झाले. यातील ४९ जणांशी संपर्क होऊ शकला. यात्रेकरूंनी त्यांच्या नातेवाइकांना आपण सुरक्षित असल्याचे कळविले असल्यास जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असल्या, तरी २०२ यात्रेकरूंशी अजून संपर्क होऊ शकला नाही. जालना १९, परभणी २७, नांदेड ११८, उस्मानाबाद १३, लातूर २७ व बीडहून ३० यात्रेकरू उत्तर भारतात गेले असल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. हिंगोली जिल्ह्य़ातून यात्रेकरू गेले नसल्याचे प्रशासनाचे मत असले तरी जिल्ह्य़ातून काही कुटुंबांतील लोक केदारनाथपर्यंत गेले होते. देवदर्शनानंतर त्यांचा दूरध्वनीही आला. मात्र, नंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.