गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीस पाणी देण्याचा निर्णय उच्चस्तरीय असून, गोदावरी खो-यावर मात्र कुठलाही अन्याय होणार नाही. पाणीवाटपाच्या समन्यायी धोरणाबाबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी केंद्र शासनाकडे विशेष निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. उजनी प्रकल्पाचे तलाव गोदावरीच्या आवर्तनातून भरून देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी कोपरगाव तालुका स्वाभिमान विकास आघाडीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, नितीनराव औताडे व उपस्थित शेतक-यांना दिले.
कोपरगाव तालुका स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने गोदावरी कालव्याद्वारे हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळावे, निळवंडे कालव्याच्या कामांना भरीव निधीची तरतूद करून कालव्याची कामे तातडीने पूर्ण करावी या प्रमुख मागण्यांसाठी रोहमारे, औताडे व शेकडो शेतक-यांनी मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्या प्रसंगी तटकरे यांना निवेदन देण्यात आले.
घाटमाथ्याकडून पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील गोदावरी खो-यात वळवून पाण्याची तूट भरून काढावी, गोदावरी कालव्यावर सतत अन्याय करणारे औरंगाबादचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातून ऊर्ध्व गोदावरी खोरे वगळण्यात येऊन स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण करावे, पीक समूहांना मुदतवाढ द्यावी, निळवंडे कालव्यांना भरीव निधीची तरतूद करून येत्या ३ वर्षांत कालव्याची कामे पूर्ण करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी अशोकराव रोहमारे, दिलीप लासुरे, पंडितराव चांदगुडे, प्रदीप औताडे, बाळासाहेब राहाणे आदी उपस्थित होते.
  संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2013 रोजी प्रकाशित  
 गोदावरी खो-यावर अन्याय होणार नाही- तटकरे
गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीस पाणी देण्याचा निर्णय उच्चस्तरीय असून, गोदावरी खो-यावर मात्र कुठलाही अन्याय होणार नाही.
  First published on:  02-08-2013 at 01:45 IST  
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No injustice for godavari tatkare