वांग-मराठवाडी धरणाचे दरवाजे खुले करून धरणातील पाणीसाठा किमान पातळीत राहील असे लेखी आश्वासन दिले असताना दरवाजाचे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे दरवाजे पूर्णपणे खुले केल्यास गेटला धोका निर्माण होईल असे कारण पुढे करून धरण व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करत आहे. त्यासाठी धरणग्रस्तांनी जलतज्ज्ञ व पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिका-यांच्या सत्यशोधन समितीद्वारे धरणाची पाहणी करून प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेण्यात आला.
तज्ज्ञ समितीचे डॉ. दि. भा. मोरे, एस. आर. गायकवाड यांनी आपली मते व्यक्त केली. राष्ट्रीय जन आंदोलनाच्या नेत्य सुनीती सु. र., प्रसाद बागवे, जितेंद्र पाटील, प्रताप मोहिते, काशिनाथ मोहिते, सुरेश पवार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अभियंता पी.बी. शेलार यावेळी उपस्थित होते.
वांग-मराठवाडी धरण सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. पाणलोट क्षेत्रामधील गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. खालचे घोटील पूर्णपणे संपर्कहीन झाले आहे. भिंतीवरून सुरू असणारी वाहतूक बंद झाली आहे. मेंढ, केकतवाडी, घोटील परिसरातील लोकांना जादा पैसे खर्च करून बाजारात यावे लागत आहे तर उमरकांचन येथील स्मशानभूमी पाण्याखाली जाऊन पिण्याच्या विहिरीत गढूळ पाणी घुसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. अशावेळी धरणाचे गेट पूर्ण खुले करून पाणीपातळी कमी करण्याची गरज असून, शासनाने गेट खुले करण्याचे लेखी पत्र दिले असतानाही धरणव्यवस्थापन मात्र, काँक्रिटीकरण नसल्याचे कारण पुढे करून दरवाजे पूर्ण खुले केल्यास धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. असे सांगत आहे. धरणग्रस्तांची दिशाभूल करत आहेत. याबाबतच वस्तुस्थिती नेमकी काय आहे? याचा आढावा घेऊन समितीने पाहणी केली.
यावेळी तज्ज्ञ समितीमधील पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिकारी तसेच निवृत्त महासंचालक सतीश भिंगारे म्हणाले, की आम्ही सिंचन विभागात काम केले आहे. त्यामुळे येथील वस्तुस्थितीचे आकलन करण्याची आमच्याकडे क्षमता आहे. येथील गेटची वस्तुस्थिी पाहता गेट उघडण्यासाठी कोणतीही समस्या आहे, असे आम्हाला वाटत नाही. परंतु शासनाच्या अधिका-यांचे म्हणणे ऐकूण घेणे महत्त्वाचे आहे. सर्व बाबी तपासून त्याचा अहवाल धरणग्रस्तांकडे देणार आहे.