* ठाण्यात मंगळवारपासून विशेष मोहीम
* उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीतही कारवाई
* वसाहतींच्या प्रवेशद्वारावर कारवाई होणार
* खास पथकांची निर्मीती
रस्त्यावर वाहनचालकांना गाठून त्यांच्या वाहनांवरील काळ्या काचांवर कारवाई करणाऱ्या ठाणे वाहतूक पोलिसांनी आता थेट मोठ-मोठय़ा वसाहतींमध्ये जाऊन अशा वाहनांच्या मालकांना हुडकून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर प्रमाणांचे उल्लंघन करून वाहनांवर काळ्या काचा लावणाऱ्या वाहनचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. तुलनेने ठाणे, नवी मुंबईत ही मोहीम फारशा प्रभावीपणे राबवली जात नाही, असे चित्र होते. मात्र येत्या मंगळवारपासून थेट खासगी वसाहतींमध्ये जाऊन पोलीस वाहनांवरील काळ्या काचा उतरवणार आहेत.
यासाठी वाहतूक पोलिसांनी पथके तयार केली असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे वाहतूक पोलिसांचे पथक शहरातील रस्ते तसेच नाक्यांवर वाहनचालकांना गाठून त्यांच्या वाहनावरील काळ्या काचांवर कारवाई करीत आहे. असे असले तरी ही कारवाई फारशा प्रभावीपणे होताना दिसत नाही. सोमवारपासून मात्र वाहतूक पोलिसांनी शासकीय कार्यालयांमधील वाहनांवरील काळ्या फिल्म्स उतरविण्यास सुरुवात केली. शासकीय अधिकाऱ्यांना कायद्याचा दट्टा देत असताना अशा काळ्या काचा मिरविणाऱ्या वाहनचालकांना हिसका दाखविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, शहरातील वसाहतींमध्ये शिरून ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आदी भागातील मोठय़ा वसाहतींच्या पदाधिकाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी पत्रे पाठविली आहेत. त्यामध्ये वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या वाहनांवरील काळ्या फिल्म्स काढण्याच्या सूचना द्याव्यात, असे म्हटले होते. अशा सूचनांनंतरही काचांवर काळ्या फिल्म्स मिरवणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दरम्यान, ज्या भागात काळ्या काचांवरील वाहनांवर कारवाई सुरू असते, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे थेट वसाहतींमध्ये जाऊन ही कारवाई हाती घेतली जाणार आहे. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच सोसायटीमधील वाहन मालकांनी त्यांच्या वाहनावरील काळ्या काचा काढून टाकाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नियम काय म्हणतो ..
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या काचा अधिकाधिक पारदर्शक असणे आवश्यक आहे. वाहनांच्या समोरील आणि मागील तसेच दरवाजांवरील काचा किती पारदर्शक असाव्यात यासंबंधी काही नियम ठरलेले आहेत. त्यानुसार पुढील तसेच मागील काच ७० टक्के, तर दरवाजांवरील काचा ५० टक्के पारदर्शक असायला हव्यात, अशी माहिती नवी मुंबई परिवहन विभागाचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. एआरएआय या शासकीय प्राधिकृत संस्थेने नियमित केलेल्या नियमांनुसार प्रत्येक कार डीलरकडून वाहनांची विक्री करताना हे प्रमाण पाळले जाते. वाहन खरेदीनंतर काही ग्राहक काचांवर नव्याने फिल्म बसवून घेतात. त्यामुळे कार खरेदीच्या वेळी डीलर्सकडून प्रमाणित केलेल्या काचांची पारदर्शकताच अंतिम असते हे वाहनचालक तसेच मालकांनी लक्षात घ्यायला हवे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2013 रोजी प्रकाशित
वाहनांवरील काळ्या काचा हुडकण्यासाठी पोलीस थेट घरापर्यत
* ठाण्यात मंगळवारपासून विशेष मोहीम * उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीतही कारवाई * वसाहतींच्या प्रवेशद्वारावर कारवाई होणार * खास पथकांची निर्मीती रस्त्यावर वाहनचालकांना गाठून त्यांच्या वाहनांवरील काळ्या काचांवर कारवाई करणाऱ्या ठाणे वाहतूक पोलिसांनी आता थेट मोठ-मोठय़ा वसाहतींमध्ये जाऊन अशा वाहनांच्या मालकांना हुडकून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 29-01-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now police at direct home for doing campaign of action on black streep glasses vans