प्राणी प्रश्नाच्या संघर्षांत शासकीय अधिकारी व राजकीय नेते नौटंकी खेळत असल्याचा आरोप, माजी पाटबंधारे मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी केला.
स्व. भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण ग्रामीण साहित्यिक प्रा. जयराम खेडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हस्के होते. माजी आमदार स्व. के. बी. रोहमारे यांच्या स्मृतिदिनी यावर्षीचे ग्रामीण साहित्य पुरस्कार लक्ष्मण बारहाते, विलास पगार, केशव वसईकर, प्रदीप पाटील, संजीवनी तडेगावकर, सदानंद सिनगारे यांना प्रदान करण्यात आले.
म्हस्के पुढे म्हणाले, के. बी. रोहमारे हे यशवंतराव चव्हाणांचे एकनिष्ठ शिष्य होते. त्या वेळी नि:स्वार्थी व प्रामाणिक कार्यकर्ते असल्याने जनतेच्या समस्या सुटण्यात अडचणी येत नव्हत्या. पण पुढील काळात कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी व जनता यांची नाळ तुटली. पाणी समस्या भविष्यात उद्भवतील, दंगली होतील ही भीती जनतेत निर्माण करण्यात येत आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी कोणीच बोलत नाही अथवा कामे करीत नाहीत. केवळ नौटंकी करत आहेत. दारणा, भंडारदरा ही धरणे ब्रिटिशांनी शेतीसाठीच बांधली, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा राजकीय स्वरुपात गैरवापर करण्यात येत आहे. त्यात शेतकरी उद्ध्वस्त होत असला तरी त्याचे सोयरसुतक कोणाला नसल्याची खंत म्हस्के यांनी व्यक्त केली. तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अशोक रोहमारे यांनीचेही यावेळी भाषण झाले. प्राचार्य डॉ. सुभाष पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. अशोक खांबेकर, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास होण, सुनील बोरा, उपनगराध्यक्षा मीनल खांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. गणेश देशमुख यांनी सूत्रसंचालन  केले. अशोक खांबेकर यांनी आभार मानले.