आपल्या ताब्यातून निसटलेल्या हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणाऱ्या, तसेच न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत मागील आठवडय़ापासून बऱ्याच आशावादी असलेल्या सूर्यकांता पाटील यांच्या पदरी अखेर निराशाच पडली. न्या. नरेश पाटील व न्या. साधना जाधव यांच्या पीठाने पाटील यांची याचिका फेटाळल्याचे वृत्त येथे येताच ‘भाऊराव चव्हाण’च्या संचालक मंडळाला मात्र मोठा दिलासा मिळाला.
‘हुतात्मा पाटील’ साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया गेल्या आठवडय़ात (दि. २२) पूर्ण झाल्यानंतर पाटील यांच्यावर मोठा भावनिक आघात झाला. त्याच वेळी राजकीय व आर्थिक साम्राज्याला तडाखा बसल्याने कारवाईनंतर त्या चांगल्याच अस्वस्थ होत्या. या पाश्र्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी आपले मौन सोडताना फटकेबाज सूर्यकांताबाईंनी राज्य सरकार, राज्य बँक यांच्यासह त्यांचा कारखाना आपल्या खिशात घालणारे त्यांचे राजकीय विरोधक तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टोलेबाजी केली. त्यामुळे स्थानिक पातळीवर या ‘साखरी संघर्षां’वर चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच पेटले.
पाटील यांच्या शाब्दिक वादांना स्वत: चव्हाण यांनी उत्तर दिले नाही. पण त्यांच्या कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी प्रत्युत्तर देताना, हुतात्मा पाटील साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया श्रीमती पाटील व त्यांच्या संचालक मंडळाच्या संमतीनेच झाली होती, असा गौप्यस्फोट केला.
राज्य बँकेने अनेक अडथळ्यांनंतर हुतात्मा पाटील साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया सुरू करताना भाऊराव चव्हाण कारखान्यास गेल्या महिन्यात पत्र दिले होते. विक्री व्यवहारातील उर्वरित ७५ टक्के रक्कम (३६ कोटी १२ लाख ७५ हजार रुपये) एक महिन्यात जमा करण्याची सूचना या पत्राद्वारे देण्यात आली. त्यानुसार ‘भाऊराव चव्हाण’ने मुदत संपण्यापूर्वी रक्कम जमा करून कारखान्याचा ताबा घेतला.
बँकेने कारखान्याला दिलेले पत्र व त्याद्वारे झालेल्या विक्री प्रक्रियेला हुतात्मा पाटील कारखान्याच्या वतीने पाटील यांनी खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांची याचिका दाखल करून घेण्यासंदर्भात सोमवारी सकाळी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांस ‘सेक्युरिटायझेशन अॅक्ट’ मधील कलम १७ अ नुसार ‘डीआरटी’मध्ये अपील करण्याची संधी आहे. त्यांनी तेथे आपले म्हणणे मांडावे, असा मुद्दा ‘भाऊराव चव्हाण’च्या वतीने अॅड. सूर्यवंशी यांनी मांडला. त्यांचे हे म्हणणे तसेच राज्य बँकेतर्फे सादर केलेली माहिती उचलून धरत न्या. नरेश पाटील व न्या. साधना जाधव यांच्या पीठाने श्रीमती पाटील यांची याचिका फेटाळल्याचे वृत्त काल दुपारीच येथे आले.
या प्रकरणात हुतात्मा पाटील कारखान्यातर्फे ‘आहे ती स्थिती कायम ठेवा’, असा हुकूम देण्याची विनंती करण्यात आली. पण न्यायमूर्ती यांनी ती फेटाळल्याचे अॅड. सूर्यवंशी यांनी दूरध्वनीवरून सांगितले. कालच्या सुनावणीस स्वत: सूर्यकांता पाटील न्यायालयात हजर होत्या. उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळण्याच्या बाबतीत त्या आशावादी होत्या; पण या निर्णायक कायदेशीर लढाईत अपयश आल्याने त्यांना व त्यांच्या निकटवर्तीयांना आणखी एक धक्का बसला.
श्रीमती पाटील यांची याचिका फेटाळण्यात आल्याची माहिती येथे समजल्यानंतर अंतिमत: सत्याचा विजय होतो, अशी प्रतिक्रिया ‘भाऊराव चव्हाण’चे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी व्यक्त केली. हुतात्मा पाटील कारखान्याचा ताबा आम्हाला रितसर मिळाला. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे, असे तिडके यांनी सांगितले. सूर्यकांताबाईंची प्रतिक्रिया समजू शकली नाही. पण ‘डीआरटी’चा (बुडीत कर्ज वसुली न्यायाधिकरण) दरवाजा ठोठावण्याची संधी त्यांना आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
आशावादी सूर्यकांता पाटलांच्या पदरी पुन्हा निराशा!
आपल्या ताब्यातून निसटलेल्या हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणाऱ्या,
First published on: 28-11-2012 at 12:05 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again suryakanta patil gets nothing hutatma patil factory sale case