राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजमंदिर अथवा सांस्कृतिक भवनासाठी निधी खर्च न करता पाण्यासाठी खर्च करावा, असे आवाहन केले होते. मात्र, त्याला हरताळ फासून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपला निधी समाजमंदिरासाठी वितरीत केला.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मुर्तुजा खान, प्रदेश सचिव संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या कामांसंबंधीची माहिती दिली. शहरातील बौद्ध विहारासाठी २५ लाख, मातंग समाजाच्या सभामंडपासाठी २५ लाख, साठेनगर येथील समाजमंदिरासाठी १० लाख, संत गोरोबाकाका सांस्कृतिक सभागृहासाठी १० लाख, भोईवस्ती येथील पत्र्याच्या शेडसाठी ५ लाख, जयभीमनगर येथील समाजमंदिरासाठी १० लाख, गवळीनगर भागातील समाजमंदिरासाठी अडीच लाख, संत गाडगेबाबा समाजमंदिरासाठी ५ लाख, सिद्धार्थनगर येथील सामाजिक सभागृहासाठी १० लाख त्यांनी देऊ केले. शहरातील शिक्षण संस्था व काही ठिकाणी विंधन विहिरींसाठीही निधी देऊ केला.
समाजातील विविध स्तरात डॉ. वाघमारे यांनी आपला निधी दिला. लातूर महापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती त्यांनी आपल्या निधीतून केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. मात्र, याच बैठकीत शरद पवारांनी खासदार-आमदारांनी आपला निधी समाजमंदिर व सांस्कृतिक भवनाच्या बांधकामासाठी न वापरता पाणीप्रश्नासाठी वापरावा, असे विधान केले होते. त्याच्या विरोधात भूमिका घेऊन हा निधी कसा काय देण्यात आला? या प्रश्नाला मात्र त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. डॉ. वाघमारे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामुळे वाघमारेंनाही आपली भूमिका सांगण्यासाठी संधी मिळाली नाही.