इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या टँकरचा स्फोट होऊन चालक असलेले देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र पुंजाजी टिक्कल (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवळालीप्रवरा (ता. राहुरी) येथे आज दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.
मुंबई येथील युनिटी लॉजिस्टीक कंपनीच्या टँकरवर टिक्कल हे चालक म्हणून काम करत होते. प्रवरानगर येथील विखे साखर कारखान्याच्या इथेनॉलची वाहतुक टँकरमधून केली जाते. मंगळवारी विखे कारखान्यावरून इथेनॉल घेऊन अकोळनेर डेपोला तो रिकामा केला. देवळालीप्रवरा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या टिक्कल यांच्या वस्तीवर त्यांनी काल टँकर आणून लावला. आज दुपारी साडेबारा वाजता टँकर फुगत चालला होता. त्यावेळी गॅस बाहेर पडावा व दुर्घटना घडू नये म्हणून टिक्कल टँकरवर चढले. टँकरचे झाकण खोलत असतानाच प्रचंड मोठा स्फोट झाला. स्फोटाबरोबर टिक्कल हे १०० ते १५० फुट अंतरावरील पत्र्याच्या शेडवर उडून पडले. गॅसमुळे ते भाजले. तसेच स्फोटामुळे त्यांच्या हात तुटले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्फोटामुळे देवळाली प्रवरा गावात घाबरट पसरली. लोक टिक्कलवस्तीकडे धावले. पोलीस व महसूल खात्याला घटनेची त्वरीत माहिती देण्यात आली. नगर, देवळाली प्रवरा, राहुरी व श्रीरामपूर येथून अग्नीशामक दल बोलावण्यात आले. स्फोट झालेल्या टँकरवर पाण्याचा मारा करुन रासायनिक वायुची तीव्रता कमी करण्यात आली. प्रांताधिकारी प्रकाश थवील, पोलीस उपअधिक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक अशोक रजपुत, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, माजी आमदार चंद्रशेखर कदम, पंचायत समितीचे सभापती शिवाजी गाडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी गावातील नागरिक मोठय़ा संख्येने जमले होते.
राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्फोटकतज्ञ आल्यानंतरच ही दुर्घटना कशी घडली यावर प्रकाश पडेल. टिक्कल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले, उपनगराध्यक्षपदही भुषवले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. स्फोटात टिक्कल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण मोठी दुर्घटना त्यांच्या प्रयत्नामुळे टळली. ज्या ठिकाणी टँकर उभा होता त्याच्या आजुबाजूला अनेक वस्त्या आहेत. टँकरचे झाकण टिक्कल यांनी उघडल्यामुळे आजुबाजूच्या घरांना व लोकांना त्याची झळ पोहचली नाही. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांना अनेकांनी श्रध्दांजली वाहिली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
देवळालीप्रवरा येथे दुर्घटना इथेनॉलच्या रिकाम्या टँकरचा स्फोट माजी उपनगराध्यक्ष टिक्कल जागीच ठार
इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या टँकरचा स्फोट होऊन चालक असलेले देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र पुंजाजी टिक्कल (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
First published on: 13-02-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died in blast of empty ethanol barrle