पुणे-सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोल्हापूर येथील आराम बस उलटून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर चारजण गंभीर असून ३३ जण किरकोळ जखमी झाले.
या बाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले की, मलकापूर (जि. कोल्हापूर) येथून मुंबईकडे निघालेली आराम बस क्र. (एम. एच. ०४. एफ. के. ६९४२) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी जुन्या टोलनाक्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.
या अपघातात धोडीराम कृष्णा पाटील (वय २८ रा. करंगळे मधली वाडी ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे जागीच मृत झाले, तर चालक तानाजी ननावरे (४२) रा. खटाव, महादेव माने (२६) खटाव. बाबासाहेब शांताराम पवार (२४ रा. कोळेगाव, ता. शाहूवाडी), सुषमा विष्णू कोतोलीकर (३३) तरकवाडी ता. शाहूवाडी कोल्हापूर हे गंभीर जखमी झाले. इतर ३३ जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.