सहा दिवसांपूर्वी रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहत येथे झालेला महिलेचा खून हा पैशाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. तुषार रमेश राऊत (वय २७, रा. प्रभात चौक, अमरावती) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रांजणगाव येथील राजमुद्रा चौकात दोन डिसेंबर रोजी शमा परविन युसूफ मन्सुरी (वय २८, रा. बुटीबोरी, सातगाव, नागपूर) या महिलेचा खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत व शमा हे बुटीबोरी येथे शेजारी राहात होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यामुळे नोव्हेंबर २०१२ मध्ये ते रांजणगाव येथे आले होते. काही दिवसांपूर्वी राऊत याने गावी असलेली जमीन विकली होती. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. यातील काही रक्कम आपल्या द्यावी म्हणून राऊत व शमा यांच्यात भांडणे झाली होती. या भांडणातच त्याने शमाचा खून करून तो पसार झाला होता. या प्रकरणी त्याला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली.