तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा फुटाळा तलावात सापडला. प्रेमभंगातून ही घटना घडली असल्याची पोलिसांची माहिती असून याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
स्वप्नील रुपराव आमदरे (रा. ओमनगर, कोराडी रोड) हे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून तो बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने त्याच्या एका मित्राला मोबाईलवर संपर्क साधून फुटाळाकडे जात असल्याचे बोलला. त्याने स्वप्नीलच्या नातेवाईकांना ही बाब सांगितली. त्यांनी इतर काही मित्रांच्या सहाय्याने फुटाळा तलाव गाठला. तेथे स्वप्नीलची स्कार्पिओ सापडली. सकाळी ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून फुटाळा तलाव गाठला. तेथे काठावर त्याचे जॅकेट सापडले. तलावात शोध सुरू झाला. तेथे दिवसभर त्याचे नातेवाईक, मित्र तसेच इतर नागरिकांची गर्दी होती.
मंगळवार सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. त्याचे कुटुंबीय दिवसभर तलावावर बसून असायचे. स्वप्नील कुठे असेल, हा प्रश्न त्यांना सतावत होता.
स्वप्नील परत येईल, अशी आशा असलेल्या त्याच्या कुटुंबीयांना मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह फुटाळा तलावात सापडला तेव्हा धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याच्या जाण्याने त्याचे मित्रही शोकाकूल झाले. स्वप्नीलचे एका तरुणीवर प्रेम होते. कुटुंबीयांचा विरोध नसल्याने तो मनोमन खूष होता. त्याने त्या तरुणीला मागणी घातली. मात्र, तिने व तिच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने त्याला धक्का बसला. मनोमन रंगवित असलेली स्वप्ने क्षणात भंग झाली. तो अस्वस्थ झाला. शनिवारी त्याने त्याच्या एका मित्राला मोबाईलवर संपर्क साधून अस्वस्थता त्याच्या कानी घातली. सध्या अमरावती मार्गावर असून फुटाळाकडे जात असल्याचे सांगून त्याने मोबाईल बंद केला. तेव्हापासून बेपत्ता असलेल्या स्वप्नीलचा शोध लागला. सापडला तो त्याचा मृतदेहच. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.