कांद्याचे किमान निर्यात मूल्य ३५० डॉलपर्यंत कमी केले असताना आता ते शुन्यावर नेण्याची मागणी पुढे आली आहे. दिल्लीला गेल्यावर ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी पुढाकार घेऊ, परंतु, हे करताना व्यापारी व शेतकऱ्यांनी आमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.
नांदगाव येथे तहसील व पंचायत समितीच्या वास्तुंचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ होते. याप्रसंगी विजयसिंह मोहिते-पाटील, खा. समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार आदी उपस्थित होते.
कांद्याचे भाव आभाळाला पोहोचले तेव्हा देशभरात ओरड झाली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने आपण एकटे उभे राहिलो. त्यांचे दु:ख मांडले. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील एकही मायेचा पूत आपल्यामागे उभा राहिला नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. भाव कोसळले किंवा वाढले तरी दोन्ही बाजूंनी शिव्या खाण्याचा हा धंदा कसा करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे दिल्लीचे सरकार दुसऱ्यांदा गेले. शीला दीक्षितांनी आपणास कांद्याचे भाव खाली आणण्यास सांगितले. तेव्हा त्यांनाही नकार देत आपण शेतकऱ्यांची बाजू घेतली. शेतकरी उद्ध्वस्त झाल्याची त्यांना चिंता नाही.
आपण तुमच्या बाजूने दिल्लीत एकाकी लढत देत आहोत. तुम्ही बघ्याची भूमिका न घेता एकसंघतेने आपल्यामागे उभे राहावे, असे आवाहन पवार यांनी केले. कांद्याचे दर भरमसाठ वाढल्यानंतर उत्पादक व व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा झाला. भाव कोसळत असतानाही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची नैतिक जबाबदारी आहे.
केवळ तेजी-मंदीचा लाभ घ्यायचा हे व्यापाऱ्यांचे वागणं बरं नव्हे, असा टोलाही पवार यांनी लगावला. पाण्याची बाटली पंधरा रुपयांना विकत घेतली जाते. त्यावर चर्चा होत नाही. मात्र, कांद्याच्या भावात थोडी जरी वाढ झाली, शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळाले तर लगेच चर्चा सुरू होते, असे ते म्हणाले.
छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवतील काय, याविषयी पवार काही वक्तव्य करतील म्हणून उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. परंतु त्यांच्या भाषणात त्याबाबत काहीही उल्लेख आला नाही. भुजबळ यांनी कांदा निर्यातमूल्य पूर्णपणे हटवावे, उत्पादन खर्चावर आधारीत शेतमालाचे भाव मिळावे, अशी मागणी केली. कांद्याचे भाव कोसळल्याने स्थानिक शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी भुजबळ यांनी केली.
अनेकांची दांडी
या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, खा. हरिश्चंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर झाले असताना ते अनुपस्थित राहिले. उलट विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव जाहीर नसताना त्यांची उपस्थिती सर्वाना चकित करून गेली.