मराठवाडय़ातील वीजग्राहक ऑनलाइन वीजबिल भरण्याबाबत दक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद ग्रामीण व जालना जिल्ह्य़ातील वीजग्राहक वीजदेयके भरण्यासाठी ऑनलाइन पर्यायाला वाढती पसंती देत आहेत. नोव्हेंबर महिन्यात ६ हजार ८६१ वीजग्राहकांनी ७ कोटी ८ लाख ८ हजार २५० रुपयांची वीजदेयके ऑनलाइन भरली.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर, पैठण, खुलताबाद व फुलंब्री उपविभागांतर्गत २ हजार ५५३ वीजग्राहकांनी २२ लाख ४२ हजार ६० रुपयांची वीजदेयके ऑनलाइन भरली. कन्नड विभागांतर्गत वैजापूर उपविभाग एक व दोन, कन्नड, सिल्लोड व अजिंठा उपविभागांमध्ये १ हजार ६६५ वीजग्राहकांनी ८ लाख ७५ हजार ९९० रुपयांची वीजदेयके ऑनलाइन भरली.  जालना जिल्ह्य़ात जालना विभाग एकमध्ये बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, जालना ग्रामीण व शहर उपविभागांतर्गत २ हजार २२७ वीजग्राहकांनी ३२ लाख ३० हजार ९२० रुपयांची वीजदेयके ऑनलाइन भरली. जालना विभाग दोनमध्ये अंबड, परतूर, घनसांगवी व मंठा उपविभागांतर्गत ४१६ वीजग्राहकांनी ७३ लाख ९ हजार २८० रुपयांची वीजदेयके ऑनलाइन भरली.
औरंगाबाद ग्रामीण मंडलातील ४ हजार २१८ वीजग्राहकांनी ३ कोटी ११ लाख ८ हजार ५० रुपयांची देयके ऑनलाइन भरली. जालना जिल्ह्य़ातील २ हजार ६४३ ग्राहकांनी ३ कोटी ९ लाख ७ हजार २०० रुपयांची देयके ऑनलाइन भरली. ६६६.ेंँं्िर२ूे.्रल्ल या संकेतस्थळावर ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट क्रमांक टाकून इंटरनेटद्वारे क्रेडिट कार्ड किंवा नेटवर्किंगद्वारे वीजबिलाचा भरणा करता येईल. ऑनलाइन बिल भरण्याची सोय उपलब्ध झाल्याने ग्राहकांना आता रांगेत उभे राहण्याची, तसेच आपले वीजबिल आलेच नाही, याची वाट पाहावी लागणार नाही, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी केले.