दररोजच्या जीवनाच्या रणांगणातील लढाई लढत मावळत्या २०१३ वर्षांला निरोप देत नवीन २०१४ वर्षांचे स्वागत करताना सोलापूरकरांनी रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबविले. तर दुसरीकडे तरुणाईने नव्या वर्षांच्या स्वागतासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत विविध हॉटेल्समध्ये जंगी पाटर्य़ा केल्या. रात्रभरात जवळपास ९४ हजार लीटर मद्य रिचविले गेले. शिवाय टनभर मटण व चिकनही फस्त करण्यात आले.
सायंकाळी सातपासून रस्त्यावर नववर्षांच्या स्वागतासाठी तरुणाई उतरली होती. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर तरुणाईचा जल्लोष सुरूच होता. यात कमालीचा बेशिस्तपणा आढळून आला. पोलिसांनी काही रस्त्यांवर नाकेबंदी केली होती. परंतु या नाकेबंदीचा परिणाम जाणवला नाही. जुळे सोलापूरपासून ते शहरात नवी पेठ, रेल्वेस्थानक परिसर, मोदी, सात रस्ता, माणिक चौक, पार्क चौक आदी भागात तरुणाई बेधुंद होऊन दुचाकी गाडय़ा उडवत धावत दिसून आली. काही भागांत टवाळगिरी तथा हुल्लडबाजीचे प्रकारही घडले.
नववर्षांचे स्वागत करताना दारू प्राशन करून वाहने चालवू नयेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता. त्यासाठी ठिकठिकाणी वाहनधारकांच्या तपासणीसाठी रस्त्यावर ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्रे तैनात होती. परंतु पोलिसांच्या लेखी प्रत्यक्षात रात्रभरातून केवळ पाच जण मद्य प्राशन करून वाहने चालवताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. एकीकडे विविध हॉटेल्स व बारमधून तब्बल ९४ हजार दारू रिचविली गेली असताना पोलिसांनी जेमतेम पाच जण दारू प्राशन करून वाहने चालविताना पकडले, याबाबत प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळाली. रस्त्यावर सुसाट वेगाने सायलेन्सर काढून दुचाकी गाडय़ा उडवत धावणा-या उत्साही तरुणांनाही रोखण्यात आले नाही. अशाप्रकारचा एकही खटला पोलिसांना दाखल करता आला नसल्याचे दिसून आले.