हिंदी सिनेमातील कथानकांचा पोत बदलतोय, मांडणीतही थोडाफार बदल होतोय असे म्हणत असतानाच चावून चोथा झालेले फॉम्र्यूलाबाजपट येत राहतात. ‘टिपिकल’ म्हणाव्या अशा चित्रपटांची संख्या नेहमीच अधिक असते. अभिनेत्री प्रीती झिंटा निर्मित ‘इश्क इन पॅरिस’ हाही त्यातलाच एक आहे. अर्थात पॅरिस दर्शन निश्चितच नेत्रसुखद आहे. पण त्यापलीकडे सिनेमा जाऊ शकलेला नाही. पुढे काय होणार त्याची कल्पना प्रेक्षकाला आधीच येत असल्यामुळे प्रेक्षकाला उत्कंठा वाटत नाही. मध्यांतरापर्यंतचा चित्रपट पॅरिस दर्शन आणि नायक-नायिकेच्या काही गमतीजमती, थोडेसे चांगले संवाद यामुळे पाहणीय होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक प्रीती झिंटासारखी वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेली अभिनेत्री चित्रपट निर्मिती करतेय म्हटल्यावर निश्चितच काहीतरी वेगळे पाहायला मिळेल अशी अपेक्षा केली जात होती. परंतु अपेक्षा सपशेल फोल ठरवत तिने निर्माती म्हणून नाही तर फक्त अभिनेत्री म्हणून या चित्रपटात आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केलाय. श्रवणीय संगीत, पाश्र्वसंगीत आणि उत्कृष्ट छायालेखन याच सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत.

‘इश्क’ हे प्रीती झिंटाने साकारलेल्या प्रमुख भूमिकेचे नाव. आपल्याच मस्तीत आणि पॅरिसच्या खुल्या वातावरणात दिलखुलास भटकणारी इश्क आपल्या अभिनेत्री आईसमवेत राहात असते. कोणतेही वचन कुणाला दिले की त्याचे पालन करावे लागते हे तिच्या स्वभावाला मानवणारे नाही. म्हणून जोडीदार शोधून लग्न करण्याच्या भानगडीत पडायचे नाही असे तिने ठरवलेय.

कधी मनाला वाटले तर अनोळखी व्यक्तींबरोबर भटकणे, दोन क्षण घालवणे, जेवणे आणि मग ‘अच्छा टाटा बाय बाय’ करणे ही तिची वृत्ती बनलीय. रेल्वेने पॅरिसला जाताना तिला आकाश (रेहान मलिक) नामक सहप्रवासी भेटतो आणि एक संध्याकाळ दोघेही पॅरिसमध्ये एकत्र घालवतात. पॅरिसमध्ये नवीन असलेल्या आकाशला पॅरिस दर्शन घडविण्याचे इश्क ठरविते. पण सुरुवातीलाच त्याला सांगून टाकते की, संध्याकाळ-रात्रभर पॅरिसमध्ये भटकू आणि सकाळी आपापल्या वाटेने निघून जायचे. एकमेकांमध्ये अजिबात गुंतायचे नाही. तो तयार होतो. मध्यांतरापूर्वी दोघेही मस्त पॅरिस भटकतात, जेवतात, कॉफी पितात, अनोळखी असल्यामुळे एकमेकांशी खरे बोलतात. आणि.. आणि अर्थातच आकाश हा इश्कच्या प्रेमात पडतो. सकाळी रेल्वेने तो पॅरिसमधून निघून जातो. पुन्हा कधीही न भेटण्यासाठी.. इथून पुढे प्रेक्षकाला माहीत असलेल्या ठरीव वळणाने सिनेमा जातो.

पॅरिसमधली दोघांनी एकत्र घालवलेली संध्याकाळ, त्यांचा पडद्यावरचा वावर आणि पॅरिसची धावती सफर एवढेच फक्त पाहण्यासारखे आहे. नाही म्हणायला दोन गाणी श्रवणीय आहेत.

आईची एकुलती एक मुलगी आणि इश्कचे वडील त्या दोघींना सोडून गेल्यामुळे नात्यांकडे, लग्नाकडे त्या नजरेतूनच पाहणारी इश्क असे हे कथानक पुढे अगदी ठरीव वळणावर जात असल्यामुळे प्रेक्षकाला रस उरत नाही. पॅरिसचे दर्शन आणि मध्यांतरापूर्वी इश्क आणि आकाश यांनी एकत्र घालवलेली संध्याकाळ पाहण्यासाठी एकदा सिनेमा पाहायला हरकत नाही.

 ‘इश्क इन पॅरिस’

निर्मात्या – प्रीती झिंटा, नीलू झिंटा, दिग्दर्शक – प्रेम राज, लेखक – प्रेम राज, प्रीती झिंटा, छायालेखक – मानुष नंदन, संगीतकार – साजिद वाजिद, कलावंत – प्रीती झिंटा, रेहान मलिक, इझाबेला अदजानी, शेखर कपूर, सलमान खान.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only paris view
First published on: 26-05-2013 at 12:03 IST