विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील मरकडा येथे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४६ व्या शाखेचे उद्घाटन नाबार्डचे महाव्यवस्थापक पी.एम. घोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, मानद सचिव त्रियुगीनारायण दुबे, संचालक बंडूजी ऐलावार, जातू खेडकर, आनंदा सातपुते, प्रशांत पोरेड्डीवार, मनोहर जोगे, सरपंच ललिता मरसकोल्हे, चामोर्शी पंचायत समितीचे सदस्य प्रमोद भगत आदी उपस्थित होते.
बँकेच्या उद्घाटनप्रसंगी पी.एम. घोले म्हणाले की, गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेने जिल्हाभर बँकेचे जाळे पसरवले असून खेडय़ापाडय़ातील जनतेला त्याचा लाभ घेता येत आहे. मरकडादेव येथे बँकेची शाखा उघडल्याने परिसरातील जनतेला शासनाच्या निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पेन्शन योजना, तेंदूपत्ता बोनस, रोहयो व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान इत्यादी योजनांचा लाभ होणार आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले की, ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मरकडादेवला बँकेची ४६ वी शाखा उघडण्यात आली. तळागाळातील घटकापर्यंत बँकिंग सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न सहकार क्षेत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात सहकारी बँकेने सहकाराची तत्त्वे सांभाळून अतिशय आधुनिक पद्धतीने वाटचाल सुरू केली आहे. सर्व शाखा संगणकीकृत झालेल्या असून कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात येत आहे. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. आयलवार यांनी केले. संचालन व आभार व्यवस्थापक अरुण निंबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे उपव्यवस्थापक टी.डब्ल्यू. भुटसे, सहाय्यक व्यवस्थापक जी.के. नरड, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.