वैजापूरजवळील नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्पात पालखेडच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिला होता. वैजापूर शहरासह २० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटेल असे मानले जात होते. मात्र या निर्णयाची अंमलबजावणीच न झाल्याने वैजापूरचे नागरिक वैतागले आहेत. उद्या ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नारंगी मध्यम प्रकल्पाची उभारणी करताना नाशिक जिल्हय़ातील पालखेडच्या डाव्या कालव्याद्वारे ४८ टक्के पाणी देणे बंधनकारक होते. पालखेड व वरील धरणे भरलेली असल्याने या धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यास त्याचा वैजापूरकरांना लाभ झाला असता. तथापि, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून येवला तालुक्यातील छोटीमोठी धरणेही भरून घेण्यात आल्याचा आरोप वैजापूरचे नागरिक करतात. हक्काच्या पाण्यापासून नाशिकच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची बाब वैजापूरच्या शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकली. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार व कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण तपशील मागविले, वैजापूर शहराला पाणी सोडण्याचे आदेशही दिले. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. झालेला घटनाक्रम पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या कानी टाक ण्यासाठी उद्या कार्यकर्ते त्यांची भेट घेणार आहेत. पाणी न सोडल्यास आंदोलन केले जाईल, असे पाणी संघर्ष समितीचे काळू पाटील वैद्य यांनी सांगितले.