तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून असलेल्या भाताची घोटी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. बाजार पेठेत दर दिवशी इगतपुरीसह शेजारील त्र्यंबकेश्वर, सिन्नर, अकोले या तालुक्यांमधूनही रोज लाखो क्विंटल भात विक्रीसाठी येत असल्याने भाताच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे भाताचे भाव घसरले असताना तांदळाचे दर मात्र वाढलेलेच आहेत. भाताच्या हमी भावासाठी लक्ष देवून शासनाने भात खरेदीसाठी एकाधिकार धान्य योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी भाताचे समाधानकारक पीक आले आहे. भात पिकाचे विक्रमी उत्पादन होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातावर प्रक्रियायुक्त उद्योगधंदे उभारले गेले. गरी कोळपी या चवदार तांदळामुळे घोटीचा तांदूळ महाराष्ट्रातील घराघरात पोहचला. भात खरेदीदारांचा व्यापारी वर्ग घोटीत तयार झाला. या व्यापाऱ्यांवर भाताच्या हमीभावाबाबत शासनाचा कोणताही अंकुश नसल्याने मनमानीे व व्यापाऱ्यांच्या मर्जीनुसार भाताचा दर ठरविला जात आहे. खरेदी विक्री संघ व आदिवासी विकास महामंडळाकडून होणारी भात खरेदी अनेक वर्षांपासून बंद असल्याने कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या व्यापाऱ्यानाच मातीमोल दराने भात विक्री करावी लागते. व्यापारी शेतातील भाताची सुमारे हजार रूपये क्विंटल याप्रमाणे खरेदी करतात. परंतु गिरण्यांमध्ये प्रक्रिया केल्यावर भाताचे रूपांतर तांदळात झाल्यावर तांदुळ सुमारे ३३०० रूपये क्विंटलने विकतात. यामुळे शेतकऱ्यांना किती नुकसान सहन करावे लागते हे स्पष्ट होते.
एकही राजकीय पक्ष भात पिकाला हमीभाव मिळावा म्हणून प्रयत्न करत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घोटी येथे शासनाने तातडीने एकाधिकार धान्य खरेदी योजना सुरू करावी, मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने अंकुश लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. स्थानिक भातापेक्षा कर्नाटकातून येणाऱ्या मसुरी व कर्नाटक या भाताला व्यापाऱ्यांची अधिक पसंती असल्याने स्थानिक भाताला दुय्यम स्थान दिले जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाताला हमीभाव मिळावा यासाठी आपण सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आ. निर्मला गावित यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील भाताला हमीभाव मिळावा, ८० किलोनुसार भाताची खरेदी करावी, या मागणीसाठी मनसेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत भाताची खरेदी करण्यात येत होती. परंतु पुन्हा शेतकऱ्यांच्या भाताची कवडीमोल दराने खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी मनसे पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे संदीप कर्पे यांनी दिला आहे.
भाताचा हमीभाव ठरविण्यसााठी शासन लक्ष देत नसल्याने भात खरेदी करणारे मनमानी भाव देत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे भगवान घारे या शेतकऱ्याने नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy prices are high but rice rate remains down in nashik
First published on: 10-03-2015 at 09:08 IST