महापालिकेच्या बालिशपणामुळे समांतर पाणीयोजना रखडली, असा आरोप अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत केला. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली. या बैठकीत समांतर योजनेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत मनपा आयुक्तांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही खैरे यांच्यासह आमदारांनी केला. ही योजना पूर्ण का झाली नाही, चूक कोणाची, याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी बंब यांनी केली. मात्र, ‘ठेकेदारांशी मैत्री’ असल्याचा आरोप करीत खैरे यांनी समांतर योजना जूनअखेर पुन्हा सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले.
गेल्या आठ वर्षांपासून सुरू असणाऱ्या समांतर योजनेचे गुऱ्हाळ सोमवारी या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले. २ मार्चला झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांतासह ‘समांतर’ चा विषय चर्चेत आला. ही योजना व्हावी, यासाठी खासदार खैरे आग्रही आहेत. ठेकेदारांशी करार झाल्यानंतरही काम सुरू होत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ठेका रद्द करण्यात येईल, अशी नोटीस दिली. त्याला ठेकेदारांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यास उच्च न्यायालयाने स्थगितीही दिली. या अनुषंगाने २६ जूनला निर्णय होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. कांबळे यांनी सभागृहात दिली.
ठेकेदाराला दिलेली नोटीस आणि योजनेवरील कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांची बदली यामुळे खैरे आयुक्तांवर चांगलेच रागावले आहेत. या बैठकीतही त्यांनी आयुक्तांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला प्रश्नांची उत्तरे आयुक्तांना देता येत नाहीत, असे ते म्हणत होते तर दुसरीकडे आर्थिक गैरव्यवहारांचे प्रश्न आल्यानंतर बैठकीची सूत्रे स्वत:कडे ठेवत कामकाज पुढे सरकवत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
आमदार बंब यांनी समांतर योजना ज्या स्थितीतून जात आहे, ती याच पद्धतीने सुरू ठेवल्यास योजना पूर्ण होणार नाही, असे सांगितले. ठेकेदारांनी दिलेले उपठेके व त्यातील आर्थिक व्यवहारांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ठेकेदारांच्या कंपनीतील भागीदारीत वाद निर्माण झाल्याने काम सुरू झाले नाही. परिणामी ठेका रद्द करण्याच्या अनुषंगाने नोटीस बजावल्याची माहिती आयुक्तांनी दिली. योजना पूर्ण न झाल्यास त्याचा औरंगाबादकरांना त्रास होऊ शकतो. ७९२ कोटींपेक्षा अधिकची सर्व रक्कम ठेकेदार भरणार असल्याने योजना सुरू ठेवणेच गरजेचे असल्याचे खैरे यांनी सांगितले. ठेकेदारांबरोबर चर्चा झाली असून, जूनअखेपर्यंत ‘समांतर’ च्या कामाला सुरुवात केली जाईल, असेही ते म्हणाले.
चर्चेदरम्यान बंब व खैरे यांच्यात खटकेही उडाले. समांतरचा ठेका दिलेल्या कंपनीने अध्र्यापेक्षा अधिक कामांमध्ये उपठेका दिला. या निविदा मंजूर करताना ठराविक ठेकेदारालाच काम मिळावे असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप बंब यांनी केला. त्याचे उत्तर आयुक्त डॉ. कांबळे यांना देता येणार नाही, असे खैरे यांनी परस्परच सांगितले. उत्तर देण्यासाठी कार्यकारी अभियंता पानझडे यांना सभागृहात बोलवा, असे आदेशही त्यांनी दिले. पानझडे यांची बदली व खैरे यांचा त्यास विरोध अशीही पाश्र्वभूमी होती, तर या बाबत आलेल्या बातम्यांचा खुलासाही खैरे यांनी आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश बैठकीत दिले. एकूणच आयुक्तांना लक्ष्य करत बैठकीचे कामकाज पार पडले.