सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात ॠषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले असून त्यांची वाटचाल काँग्रेस प्रवेशाच्या दिशेने सुरू असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पंढरपूर भेटीच्या पार्श्वभूमीवर ही बाब विशेषत्वाने अधोरेखीत होत आहे.
परिचारक हे पंढरपूरचे सुमारे २५ वर्षे आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची चार शकले उडाली. यात पंढरपूर-मंगळवेढा या नावाने स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला खरा; परंतु मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पक्षांतर्गत साठमारीच्या राजकारणातून धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलली. यात परिचारक, मोहिते-पाटील हे दुरावले गेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ गेले. तथापि, नंतर परिचारक यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ झाली. अलीकडेच त्यांच्याकडील गेल्या आठ वर्षांपासून असलेले एस. टी. महामंडळाचे अध्यक्षपद एका झटक्यात काढून घेऊन ते अजित पवार यांचे निकटचे नातेवाईक उस्मानाबादचे जीवन गोरे यांना देण्यात आले. त्यामुळे परिचारक यांची अवस्था आणखी बिकट होत गेली.
या पाश्र्वभूमीवर पंढरपूर अर्बन बँकेच्या शतक महोत्सव समारंभासाठी परिचारक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निमंत्रित केले. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. परंतु पवार हे येत नसल्याचे पाहून परिचारक यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांनी वैतागून अखेर काँग्रेसचे नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना गळ घातली. शरद पवार यांच्या बदल्यात आपण परिचारक यांचा कार्यक्रम स्वीकारणे सुशीलकुमारांना प्रशस्त वाटले नाही. त्यांनी मग परिचारक यांच्या पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यक्रमासाठी थेट राष्ट्रपतींना निमंत्रित करण्याचा प्रस्ताव ठेवला. तालुका व फार तर जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती येणे ही बाब मानाची व प्रतिष्ठेची झाली. त्याप्रमाणे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पंढरपूर अर्बन बँकेचा शतक महोत्सव सोहळा संपन्न झाला. मात्र या कार्यक्रमासाठी बँकेने दिलेल्या वृत्तपत्रीय जाहिरातीत शरद पवार यांच्या छायाचित्राला स्थान नव्हते. तर याउलट, यानिमित्ताने सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रपतींच्या पंढरपुरातील स्वागताच्या निमित्ताने दिलेल्या वृत्तपत्रीय जाहिरातीत शरद पवार, अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील ते माजी आमदार राजन पाटील यांच्यापर्यंत जवळपास जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यातील आजी-माजी आमदार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची छायाचित्रे होती. त्यात केवळ ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्या छायाचित्राचा अभाव होता. पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यक्रमासाठीच्या जाहिरातीत शरद पवार यांचे छायाचित्र नाही म्हणून स्थानिक राष्ट्रवादीच्या स्वागतपर जाहिरातीत परिचारक यांचे छायाचित्र नसणे यांचा परस्पर संबंध जोडला जात आहे. त्यातून राष्ट्रवादीत कंटाळलेले परिचारक हे आता पक्षापासून दुरावत चालल्याचे मानले जात आहे. त्यास आणखी एका घटनेची पुष्टी मिळाली असून ती म्हणजे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना व बँकेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीची मंडळी इच्छूक असताना परिचारक यांच्या आग्रहाने काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांची अध्यक्षपदी निवड झाली. यात परिचारक यांच्यावर नाराज गटाने विश्वासघात केल्याचा आरोप केला. मात्र काँग्रेसचे आमदार माने हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होणे, हा योगायोग नसून, परिचारक यांच्या आगामी राजकीय वाटचालीची खूणगाठ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यात सध्या त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक हे अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप असून त्याची चौकशीही सुरू आहे. यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी म्हणून परिचारक हे राष्ट्रवादीत दबावाचे राजकारण खेळत असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे.