थकलेल्या कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीने सोमवारी सकाळी सर्व खाजगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर सिल केल्याने शहर व परिसरातील मोबाईलसेवा तीन तास ठप्प झाली होती. एकटय़ा बीएसएनएलची सेवा सुरु होती, मात्र खाजगी कंपन्यांचेही ग्राहक बहुसंख्येने असल्याने संपर्काअभावी सर्वच ग्राहक अस्वस्थ झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, पंधरा दिवसांच्या आत थकबाकी जमा करण्याचे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर दुपारनंतर एअरटेल, आयडिया व टाटा या कंपन्यांची सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली, तर इतर कंपन्यांची सेवा उशिरापर्यंत विस्कळीतच होती.
शहरात एअरटेल, टाटा, रिलायन्स या खाजगी कंपन्यांचे टॉवर्स आहेत. तर आयडिया, युनिनॉर , व्होडाफोन व एमटीएस या कंपन्यांनी टाटाचा टॉवर शेअर केला आहे. टॉवर शेअर केलेल्या कंपन्यांपैकी आयडिया कंपनीकडून ग्रामपंचायत कर वसुली करीत आहे, तर व्होडाफोन, युनिनॉर व एमटीएस या कंपन्यांकडेही कराची मागणी करण्यात आली आल्याचे सरपंच अण्णासाहेब औटी व उपसरपंच संदीप देशमुख यांनी सांगितले. रिलायन्सने ग्रामपंचायतीचा तिन वर्षांंपासून करच भरला नसल्याने या कंपनीकडे ग्रामपंचायतीची सर्वाधीक १ लाख ७९ हजार ६०१ रुपये थकबाकी आहे. भारती एअरटेलकडे दोन वर्षांंचा १ लाख १९ हजार ७३४, टाटा व आयडियाकडे एक वर्षांंचा प्रत्येकी ५९ हजार ८६७ इतका कर थकला आहे. या कंपन्यांकडे ग्रामपंचायतीने वारंवार मागणी करुनही कर भरण्याबाबत कानाडोळा केला गेल्याने ग्रामपंचायतीने रितसर टॉवर बंद करून कर भरण्याच्या मागणीसाठी ते सिल केल्याचे औटी व देशमुख यांनी सांगितले.