आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी आतापासूनच करायला सुरुवात केली असून सोलापुरात तर कार्यकर्ते व मतदारांना खूश करण्यासाठी ‘श्रम परिहारा’च्या नावाखाली मांसाहारी व शाकाहारी भोजनाच्या मेजवान्या झडू लागल्या आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजल्या जाणा-या काँग्रेस पक्षाने कोणतीही जोखीम न पत्करता मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते.
एकीकडे विविध विकासकामांच्या माध्यमातून सामान्य मतदारांवर छाप पाडण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा ‘विकास रथ’ फिरत असताना दुसरीकडे स्वत: शिंदे हे गेल्या दोन महिन्यांपासून सोलापुरात वारंवार येऊन लोकसभा निवडणुकीची तयारी करताना दिसतात. त्यासाठी या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे भेटीगाठी, मेळावे, बैठका, हुरडा पाटर्य़ा वाढत आहेत. आतापर्यंत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा-पंढरपूर, सोलापूर शहर मध्य व शहर उत्तर या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांशी शिंदे यांचा संपर्क वाढला आहे. याशिवाय विविध समाजांचे मेळावे, अधिवेशने यांनाही हजेरी लावण्याकडे शिंदे यांचा कल वाढल्याचे दिसून येते.
विशेषत: विधानसभा मतदारसंघनिहाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्तरीत्या होणा-या मेळाव्यांना ‘कृतज्ञता’ असा गोंडस शब्द दिला गेला असला तरी प्रत्यक्षात त्या माध्यमातून शिंदे यांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसून येते. या मेळाव्यांच्या जोडीला उपस्थित हजारो कार्यकर्ते व सामान्य मतदारांना आपलेसे करण्यासाठी मेजवान्याही होताना दिसतात. यात शाकाहारीबरोबर मांसाहारी भोजनाचा बेत आखला जात आहे. मेळाव्यांमध्ये नेत्यांची भाषणे ऐकल्यानंतर लगेचच बाजूलाच घातलेल्या शामियान्यामध्ये मेजवान्या झडतात. शाकाहारी व मांसाहारी मेनूंवर ताव मारताना सोबत मनोरंजनपर संगीत ऑर्केस्ट्राचा आनंद घेता येतो. जेवणासाठी व्यासपीठावरून संयोजक नेत्यांचा आग्रह होत असला तरी या मेजवान्यांच्या आयोजनामागे कोणताही राजकीय स्वार्थ दडला नसून सामान्य कार्यकर्त्यांचा ‘श्रम परिहार’ व्हावा हाच एकमेव हेतू असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले हे देतात. मात्र या निमित्ताने मेजवान्यांसाठी होणारा खर्च मोजण्याची कोणतीही यंत्रणा तूर्त तरी दिसत नाही. एका मेळाव्यात होणा-या मांसाहारी जेवणावळीसाठी किती बोकडांचा बळी दिला जात असेल, याची माहिती उपलब्ध होत नाही. ती किमान शेकडोंच्या प्रमाणात असावी, असा कयास जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत. एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये शिंदे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे मिळणारा ‘पौष्टिक लाभ’ पाहता उत्साहाचा माहोल पसरल्याचे दिसून येते, तर याउलट, महायुतीमध्ये अद्यापि सन्नाटा दिसून येतो. काही हितसंबंधी मंडळीही शिंदे यांच्या उमेदवारीवर ‘डोळा’ ठेवून स्वत:ला ‘लखलाभ’ होतो का, यंदाच्या वर्षीची दिवाळी दोनवेळा साजरी करता येईल का, याचा विचार करीत असल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराबरोबर मेजवान्याही झडू लागल्या
आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी आतापासूनच करायला सुरुवात केली असून सोलापुरात तर कार्यकर्ते व मतदारांना खूश करण्यासाठी ‘श्रम परिहारा’च्या नावाखाली मांसाहारी व शाकाहारी भोजनाच्या मेजवान्या झडू लागल्या आहेत.
First published on: 18-02-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party celebration start in solapur with the promotion of congress