एरवी धावपळ करत गाडी पकडणारे प्रवासी बुधवारी सकाळी आपल्या नेहमीच्या गाडीच्या वेळेपेक्षा थोडे आधी स्थानकात पोहोचले आणि त्यांनी गाडीच्या सजावटीला सुरुवात केली. निमित्त होते दसरा साजरा करण्याचे. गाडीच्या पुढच्या बाजूस हार घातल्यानंतर डब्यात महालक्ष्मीचे पूजन करण्यात आले.
आरती झाल्यानंतर गाडीमध्येच सोन्याची उधळण केली जाते. यानंतर मिठाई, सामोसे याचे वाटप केले जाते. तसे हे वातावरण दरवर्षीच दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईच्या जीवनवाहिनीमध्ये पाहावयास मिळते. पण यंदा दसऱ्याच्या आदल्या दिवशी सुट्टी आल्यामुळे दोन दिवस आधीच दसरा साजरा करण्यात आला. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कर्जत, कसारा, कल्याण अशा लांबच्या स्थानकांमधून येणाऱ्या प्रवाशांचे जाऊन-येऊन चार ते पाच तास उपनगरी गाडीमध्येच जातात. यामुळे त्यांचे गाडीशी आणि तेथील आपल्या सहप्रवाशांशी विशेष नाते असते. हे नाते जपण्यासाठी गाडीमध्ये सण साजरे करण्यास सुरुवात झाली.
ही परंपरा काही वर्षांपुरतीच मर्यादित न राहता काही ठरावीक गाडय़ांमध्ये तर ३४ वर्षे हा सण साजरा केला जात आहे. नियमित या गाडीने प्रवास करणारे पण सध्या निवृत्त झालेले अनेक प्रवासीही या निमित्ताने आपल्या ग्रुपच्या भेटीला येत असतात.