मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘टर्मिनल-२’चे उद्घाटन मोठय़ा थाटामाटात झाल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याची टीमकी जीव्हीके आणि सरकार दोघांकडून वाजविण्यात येत आहे. तसेच मुंबईत उतरणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांना ‘टर्मिनल-२’वर इमिग्रेशन, सामान आणि सुरक्षा तपासणीसाठी ताटकळत राहावे लागू नये, म्हणून काउंटर्सची संख्या मुबलक आल्याचाही दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना ६० पैकी केवळ १० ते १२ इमिग्रेशन काऊंटर्स उपलब्ध होतात. परिणामी ‘टर्मिनल-२’वर घडणारी पायपीट आणि खोळंबा करणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
नव्याने उभारण्यात आलेले ‘टर्मिनल-२’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट टर्मिनल आहे. या टर्मिनलवर प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधाही करण्यात आल्या आहेत. येथे उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या बॅगा पटकन मिळाव्यात यासाठी तेथे दहा बॅगेज काऊंटर्स, रात्री उशीरा मोठय़ा संख्येने आंतरराष्ट्रीय विमानांतून उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ६० इमिग्रेशन काऊंटर्स, अनेक सुरक्षा तपासणी काऊंटर्स असा सरंजाम या नव्या ‘टर्मिनल-२’वर असल्याचे जीव्हीकेने सांगितले होते. त्यामुळे या आकर्षक अशा टर्मिनलवर फार काळ ताटकळत राहावे लागणार नाही, असा प्रवाशांचा समज होता. मात्र तो आता फोल ठरू लागला आहे.
प्रत्यक्षात ‘टर्मिनल-२’वरुन प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १० बॅगेज काऊंटर्स असूनही बॅगा वेळेत मिळत नाहीत, ६० इमिग्रेशन काऊंटर्सपैकी केवळ १० ते १२ काऊंटर्सच सुरू असतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर तासाला २०-२५ विमाने उतरतात. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या प्रवाशांच्या इमिग्रेशनसाठी पुरेशी काऊंटर्स नसल्याने बराच वेळ रांगांमध्ये उभे राहावे लागते, अशी तक्रार प्रवासी करू लागले आहेत.‘टर्मिनल-२’चे बाह्य़रूप आंतरराष्ट्रीय असले, तरी कारभार अगदी देशी पद्धतीने दिरंगाईनेच चालतो. काऊंटर्सची संख्या मुबलक असताना गर्दीच्या वेळी केवळ १०-१२ काऊंटर्स सुरू ठेवण्यात काय मतलब आहे, असा प्रश्न काही संतप्त प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. यावरुन नव्या टर्मिनलवर इमिग्रेशन काउंटर्सवरील गर्दी कमी करण्याचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या संदर्भात इमिग्रेशन अधिकाऱ्यांशी संपर्क शाधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.