माळढोक पक्षी अभयारण्यासाठी कर्जत, श्रीगोंदे, करमाळा, मोहोळ व इतर तालुक्यांमधील शेतजमिनींची थांबवलेली खरेदी-विक्री व कर्जव्यवहारांवरील निर्बंध बेकायदेशीर असल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज कर्जतच्या शिष्टमंडळाशी बारामती येथे बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते संभाजीराजे भोसले, अ‍ॅड. शिवाजीराव अनभुले, तालुकाध्यक्ष नानासाहेब निकत, राजेंद्र गुंड, दीपक शिंदे, अशोक जायभाय, सुनील शेलार, आबासाहेब डमरे, बबनभाऊ नेवसे, अक्षय तोरडमल आदींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बारामती येथे पवार यांची भेट घेतली.
या वेळी निकत, शिंदे व जायभाय यांनी तालुक्यांच्या जेवढय़ा क्षेत्रात माळढोक वावरत असल्याचे दाखवले त्या सर्व गट नंबरचे खरेदी-विक्री व्यवहार प्रकटन जाहीर करून बंद करण्यात आले आहेत. त्यावरील क्षेत्रावर बँकांनी  सर्व प्रकारचे कर्जवाटप बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, सलग दोन वर्षांचा दुष्काळ पडलेला असताना यंदा किमान पेरणीपुरता पाऊस झाला आहे, मात्र बियाणे व खते खरेदीसाठी शेतक-यांकडे पैसे नाहीत, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर तातडीने तोडगा काढावा, माळढोक पक्षी हा कर्जत तालुक्यात कधीच आढळलेला नसल्याने हे आरक्षण उठवावे अशी मागणी केली.
अशा प्रकारे या जमिनींची खरेदी-विक्री व्यवहार बंद करण्याचा अधिकार महसूल अधिका-यांना नाही असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, त्यांनी तो कसा वापरला, बँकांनी कर्ज देण्याचे बंद केले हा निर्णय तर धक्कादायक आहे. अद्याप या क्षेत्राचा समावेश अभयारण्यात झालेला नाही, शिवाय शेतक-यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही, त्यामुळे असे चुकीचे निर्णय घेणे चांगले नाही. प्रश्नावर लवकरच वन व महसूल विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले.