सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती वरचेवर भीषण होत असताना येथील उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी मिळण्याची मागणी एकीकडे जोर धरत असताना याच दुष्काळी जिल्ह्य़ातील माढा लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल अकलूजमध्ये दुष्काळी स्थितीची आढावा बैठक घेतली. परंतु नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांनी कोणतीही ठोस आश्वासक भूमिका न घेता या जिल्ह्य़ाला अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल शुक्रवारी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे अकलूजला आले होते. या दोघा काका-पुतण्यांनी सोलापूर जिल्ह्य़ासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला झिडकारले, तर पुणे जिल्ह्य़ातील भामा-आसखेड धरणातून उजनी धरणात दोन टीएमसी पाणी देण्यासही नकारघंटा वाजविली. सोलापूरसाठी त्यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी मिळवून देण्याचे गाजर दाखविले. शरद पवार यांनी तर, पुणे जिल्ह्य़ातून उजनी धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चाही करू नका. त्यामुळे सोलापूरची जनता जागृत होईल, अशा शब्दात जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींना बजावले.
पाण्याअभावी कोरडय़ा पडलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी मिळावे म्हणून गेल्या महिन्यात माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रश्नावर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अजित पवार समर्थक असलेल्या आमदार बबनराव शिंदे यांना स्वत: अजित पवार यांनी नकारात्मक भूमिका मांडत ‘थंड’ केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळ कायमचा मिटविण्यासाठी यापूर्वी शासनाने मंजूर केलेली कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा चालविला आहे. याशिवाय प्राप्त परिस्थितीत उजनी धरणात पुण्यातील भामा-आसखेड धरणातून दोन टीएमसी पाणी सोडता येते, हा मुद्दा त्यांनी आग्रहाने उचलून धरला आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सोलापूरसाठी पिण्यासाठी पाणी आणता येईल. त्या मोबदल्यात कोल्हापूर जिल्ह्य़ातील दूधगंगा धरणातील दोन  टीएमसी पाणी आलमट्टी धरणात देता येईल, असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेवला आहे. आलमट्टी धरणासाठी अगोदर दूधगंगा धरणाचे पाणी सोडणे व नंतर आलमट्टी धरणाचे पाणी सोलापूरसाठी सोडणे ही प्रक्रिया म्हणावी तशी सहजसोपी नाही. त्यासाठी महाराष्ट्राचे उच्चाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटावे लागणार आहे. त्याची जबाबदारी अजित पवार यांनी सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यावर सोपविली आहे. प्रा. ढोबळे यांची कार्यक्षमता विचारात घेता याकामी ते कितपत यशस्वी होतील, याबाबत खुद्द राष्ट्रवादीच्या गोटातच शंका उपस्थित होत आहे. आलमट्टी धरणातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू आहे.परंतु त्यावर अद्याप ठोस कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे आलमट्टी धरणाचे पाणी सोलापूरसाठी खरोखर मिळणार काय, ही शंका वाढायला बराच वाव आहे. यातून सोलापूरकरांना पाण्यासाठी केवळ गाजर दाखविण्याचा डाव असू शकतो, अशी चर्चा आता उघडपणे ऐकायला मिळत आहे.
आलमट्टी धरणापेक्षा पुण्यातील भामा-आसखेड धरणाचे पाणी मिळणे सहज व सोपे आहे. कारण एक तर भामा-आसखेड धरणातील सध्या शिल्लक असलेले सुमारे आठ टीमएसी पाणी सिंचन किंवा पिण्यासाठी वापराविना साठलेले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासूनचे भामा-आसखेड धरणाचे अंतर अवघे पन्नास किलोमीटर एवढेच आहे. त्याचा विचार करता भामा-आसखेड धरणाचे पाणी उजनी धरणात सोडणे सहज शक्य आहे. त्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पाठपुरावा केला असला तरी त्याप्रमाणे पवार काका-पुतणे मर्जी दाखवित नाहीत. सोलापूरसाठी पाणी मिळणे हे सर्वस्वी पवार काका-पुतण्यावर अवलंबून राहिले आहे, हे मात्र निश्चित. सोलापूर जिल्ह्य़ाने शरद पवार यांची अनेक वर्षांपासून साथसोबत केली आहे. परंतु त्याचे अपेक्षित फळ सोलापूरला मिळत नसल्याचे सोलापूरकरांना यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत स्पष्टपणे जाणवत आहे.
एकीकडे पाण्याच्या प्रश्नावर सोलापूर जिल्हा संवेदनशील बनत चालला असून त्याबाबतची जाणीव झाल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी पाणी मिळण्यासाठी आटापिटा चालविला आहे. विशेषत: पुणे जिल्ह्य़ातून पाणी मिळण्यासाठी जोरदार आग्रह धरला जात असताना पवार काका-पुतण्यांनी पुणे जिल्ह्य़ातून सोलापूरच्या उजनी धरणात पाणी सोडण्याची चर्चाही करू नका म्हणून लोकप्रतिनिधींना बजावले आहे. त्यामुळेही लोकप्रतिनिधी यापुढे पाण्यासाठी आग्रही न राहता ‘साहेब म्हणतील तसं’ अशी बोटचेपी भूमिका घेतील. परंतु त्याचवेळी त्यांच्या मनात आगामी विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याचीही चिंता सतावणार आहे. पाण्याअभावी भीषण दुष्काळात सोलापूर जिल्हा होरपळत असताना सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण होत असून त्याला पर्याय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे येत आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिळविलेले यश म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा होती. परंतु त्यापासून योग्य बोध घेतला गेला नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोलापूरचा ‘स्वाभिमान’ आणखी जागृत होण्याची चिन्हे दिसत आहेत.