नायलॉन मांजा विक्रीला बंदी असताना मकर संक्रातीच्या दिवशी त्याची राजरोसपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून मांजा जप्त करत महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. नवीन नाशिक परिसरातील ११ विक्रेत्यांकडून १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या घटनेमुळे अनधिकृतपणे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पतंगोत्सवात नायलॉन मांज्याचा होणारा वापर निसर्ग साखळीतील महत्वपूर्ण घटक असलेल्या पक्ष्यांच्या जीवावर बेतत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडविण्यासाठी वापरलेला हा मांजा लवकर कुजत नाही.
तो वर्षभर झाडांवर तसाच लटकून पडतो. त्यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होतात. काही जण दगावतात. नायलॉन मांज्यामुळे वर्षभर पक्ष्यांवर संक्रांत कोसळते. या पाश्र्वभूमीवर, पक्षीप्रेमींनी या मांज्यावर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती.
मागील वर्षीपासून या मांज्याच्या वापरावर व विक्रीवर बंदी घालण्यात आली. असे असताना काही विक्रेते छुपेपणाने त्याची विक्री करत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार संबंधितांनी शिवाजी चौकसह इतर वेगवेगळ्या भागात छापे टाकले. त्या ठिकाणी नायलॉन मांज्याची अनधिकृत विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
जवळपास ११ विक्रेत्यांकडून या मांज्याची विक्री सुरू होती. त्यांच्याकडून दोन ते तीन गोणी नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. या विक्रेत्यांकडून एकूण १८ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.