डोंबिवली येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या काळात ‘अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटने’च्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून मोठय़ा प्रमाणात अन्याय सुरू असल्याची माहिती ‘लोकसत्ता’ने अलीकडेच प्रसिद्ध केली होती. कर्मचारी नियमानुसार कामे करत असूनही त्यांच्या रजा रद्द करणे, कर्मचाऱ्यांशी अरेरावीने वागणे अशा अनेक गोष्टी महाविद्यालयात सुरू आहेत. हे सर्व गैरप्रकार लवकरात लवकर थांबविले जावेत अशी मागणी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेन केली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्य हे भेटण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. हे सर्व गैरप्रकार थांबले नाहीत तर येत्या दोन दिवसांनंतर कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात मोठे आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही मुंबई विद्यापीठाचे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग यांनी दिला आहे.दरम्यान, पेंढरकर महाविद्यालयात सुरू असलेल्या हुकूमशाहीविरोधात आवाज उठविण्यासाठी काही माजी विश्वस्त, निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि माजी विद्यार्थी एकत्रितपणे ‘पेंढरकर महाविद्यालय बचाव संघर्ष समिती’ स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.