नोंदणी करणारी यंत्रणा तोकडी, नागरिकांचे हाल
युनिक अॅथॉरिटी आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियातर्फे ‘आधार’ ओळखपत्र देण्याची दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया जिल्ह्य़ात सुरू झाली असली, तरी नियोजनशून्य कारभाराचा फटका या कामाला बसला आहे. ‘आधार कार्ड’ हेच सरकारी योजनांच्या लाभासाठी ‘आधार’ ठरणार असल्याची चर्चा सुरू होताच ओळखपत्र मिळवण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्या तुलनेत यंत्रणा मात्र तोकडी पडत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील ३२ आणि अमरावती शहरातील १० नोंदणी केंद्रांमधून अनुक्रमे २५ हजार १६९ व ५ हजार २६० नागरिकांनी आधार ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत जिल्हाभरात ३ लाख २५ हजार १८७, तर अमरावती महापालिकेच्या हद्दीतील ७९ हजार ४३६ लोकांनी नोंदणी केली आहे. अमरावती जिल्ह्य़ाची लोकसंख्या २८ लाख ८७ हजार ८२६ आहे. त्या तुलनेत नोंदणीचे प्रमाण हे ४८ टक्के आहे, अजूनही ५० टक्क्यांवर लोकांना आधार ओळखपत्र मिळायचे आहे. आधार ओळखपत्र वितरणाच्या कामाचा आधीच फज्जा उडाल्याने देखील लोकांमध्ये या प्रक्रियेविषयी संभ्रम आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी करणाऱ्या हजारो नागरिकांना अजूनही ओळखपत्र मिळालेले नाही. एकाच वेळी ओळखपत्रासाठी नोंदणी करणाऱ्या कुटूंबातील काही सदस्यांना ओळखपत्र आणि इतरांना प्रतीक्षा असे चित्र असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
या जिल्ह्य़ात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात १३ लाख ९५ हजार लोकांनी आधारकार्डसाठी नोंदणी केली आहे. गेल्या काही दिवसात नोंदणी करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे, पण या लोकांना सुविधा पुरवण्यात मात्र प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. अमरावती महापालिकेच्या हद्दीत केवळ १० केंद्रांवर नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या भौगोलिक स्थितीचा विचार न करता या केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याने बहुसंख्य नागरिकांना केंद्र शोधण्यातच अधिक वेळ गमवावा लागत आहे.
जिल्ह्य़ात तर फक्त ३२ केंद्र आणि नोंदणीसाठी केवळ १४९ किट्स उपलब्ध आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येत नागरिक ओळखपत्रासाठी प्रतीक्षायादीत असताना त्यांना योग्य माहिती दिली जात नाही, अशी ओरड आहे. दुसरीकडे प्रचाराचा अभाव आहे. लोकांपर्यंत केंद्रांविषयी आणि प्रक्रियेविषयी माहिती पोहोचवली जात नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. आधार ओळखपत्र वितरणाबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनाने विविध पातळीवर सभांचे आयोजन करणे गरजेचे आहे. ओळखपत्राच्या नोंदणीसाठी योग्य माहिती उपलब्ध करून दिल्यास या केंद्रांवर सध्या उडत असलेला गोंधळ टाळता येईल.
ओळखपत्रे तयार झाल्यानंतर त्यांचे वितरण केव्हा आणि कशा पद्धतीने होईल, याविषयी देखील नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे, पण कमी मनुष्यबळाचे रडगाणे गाणाऱ्या प्रशासनाने यासंदर्भात अजूनही काहीच व्यवस्था केलेली नाही.
केंद्रांमध्ये संगणकांची संख्या कमी असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ उडत आहे. दररोज नियोजित वेळेतच हे काम करण्यात येत असल्याने रांगेत
शेवटी उभ्या असणाऱ्या नागरिकांचा संयम सुटत आहे. एका कामासाठी दोन दिवस घालवावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अमरावती शहरात काही केंद्रांवर फारशी अडचण जाणवत नसली, तरी जिल्ह्य़ात ग्रामीण भागात मात्र यंत्रणा तोकडी पडत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2012 रोजी प्रकाशित
अमरावती जिल्ह्य़ात ‘आधार’साठी लोकांची वणवण
युनिक अॅथॉरिटी आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियातर्फे ‘आधार’ ओळखपत्र देण्याची दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया जिल्ह्य़ात सुरू झाली असली, तरी नियोजनशून्य कारभाराचा फटका या कामाला बसला आहे. ‘आधार कार्ड’ हेच सरकारी योजनांच्या लाभासाठी ‘आधार’ ठरणार असल्याची चर्चा सुरू होताच
First published on: 27-12-2012 at 01:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peoples are faceing the problems for getting the aadhaar card