समाजसेवक देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल देत असलेल्या आदिवासींच्या हक्काचा लोकलढा स्नेहांकितच्या कलावंतांनी राज्य नाटय़ स्पध्रेत ‘मावा नाटे माटे सरकार’ या नाटकाच्या माध्यमातून समर्थपणे रेखाटला. रंगमंचावर सादर झालेल्या या नाटय़कलाकृतीने रसिकश्रोत्यांची मने जिंकली.
 नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील लेखामेंढा गावाने ‘मावा नाटे माटे सरकार’ ही गोंडी भाषेतील दिलेली घोषणा जागतिक पातळीवर पोहोचली होती. आमच्या गावात आम्हीच सरकार, अशा अर्थाच्या या घोषणेव्दारे केलेल्या लोकशाही आंदोलनातून वनहक्क मिळविणारे हे देशातील पहिलेच गाव ठरले. या गावाचा आपले हक्क मिळविण्यासाठीचा संघर्ष लेखक-अभिनेते श्रीपाद जोशी व किशोर जामदार यांनी या नाटकातून मांडला आहे.
विलास बोझावार यांनी आपले दिग्दर्शकीय कौशल्य पूर्ण पणाला लावल्याचे नाटकातून जाणवत होते. श्रीपाद जोशी यांनी देवाजी तोफा यांची भूमिका अभ्यासपूर्ण पध्दतीने सादर केली. विशेष म्हणजे, या नाटकातील नवख्या तरुण कलावंतांनीही उल्लेखनीय अभिनय केला. मोहन हिराबाई हिरालालच्या भूमिकेत किशोर जामदार व पत्रकाराच्या भूमिकेतील अ‍ॅड. वर्षां जामदार यांनीही आपल्या भूमिका अतिशय प्रामाणिकपणे साकारल्या.
यातील कोंबडय़ाच्या झुंजीच्या प्रसंगात खूप धमाल उडते. नाटकातील संगीत परिणाम साधणारे होते, तर नेपथ्य अतिशय कल्पकतेने साकारले आहे.
त्रृटींचा विचार केल्यास नाटक काहीसे पथनाटय़ाच्या किंवा लोकनाटय़ाच्या अंगाने जाणारे वाटते. प्रसंगाने परिणामाची उंची गाठल्यावर दुसऱ्या प्रसंगाच्या आधीचे निवेदन किंवा तीन व्यक्तीरेखांचे संभाषण प्रसंगांचा परिणाम थोडा कमी करते. हे नाटक सत्यघटनेवर आधारित असल्याने या व्यापक आंदोलनाला नाटकात सामावणे कठीण असले तरी लेखक व दिग्दर्शकाने अतिशय कुशलतेने संहिता तयार केली आहे. बांबू विक्रीच्या लढय़ाच्या शेवटी एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवलेली जयराम रमेश यांच्या भाषणाची खरी चित्रफित नाटकाचे खास वैशिष्टय़ आहे. एकूणच एका छोटय़ा खेडेगावाचा संघर्ष पडद्यावर अतिशय रंजकतेने मांडण्यात आलेला आहे.