हेमंत गोडसे (शिवसेना) – नाशिक

अतिउत्साही पण पाठपुराव्यात कमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभरातील कामांची मोठी जंत्री खासदारांनी सादर केली असली तरी स्थानिक विकास निधी व जनसुविधांतर्गतची कामे वगळता त्यांना फार काही करता आलेले नाही. कोणत्याही विषयावर वेळ न दडविता निवेदन देणे, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम राहिल्याचे लक्षात येते. एखादी मागणी करणे वेगळे आणि ती मान्य करून प्रत्यक्ष पदरात काही पाडून घेणे वेगळे. मागणी केल्यावर तिचा पाठपुरावा करण्यात ते कमी पडतात. सिंहस्थासाठी निधी मिळावा म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्याना साकडे घातले होते. परंतु, सुमारे अडीच हजार कोटींच्या सिंहस्थ आराखडय़ात केंद्राने निकषावर बोट ठेऊन अतिशय तुटपुंजी मदत देण्याची तयारी दर्शवत बोळवण केली. खासदार निधीतील कामांवर नजर टाकल्यास त्यांचा जोर रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणावर राहिल्याचे दिसते. त्या जोडीला सामाजिक सभागृह बांधणे, स्मशानभूमीचे नूतनीकरण अशा बांधकामात त्यांनी रस दाखविला. बाकी एखादा नवीन प्रकल्प वा ठळकपणे नजरेत भरेल अशा काही कामाची पाटी मात्र अद्याप कोरीच आहे. लोकसभेतील कामगिरी तशी निराशाजनकच आहे.

सिंहस्थ कामाचे नियोजन, सिन्नर तालुक्याचा पाणी प्रश्न, भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण, औद्योगिक प्रदर्शनासाठी कायमस्वरुपी व्यवस्था, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी, हवाई नकाशावर नाशिकला स्थान मिळावे म्हणून ‘मोनो मेट्रो सिरीज एअर कनेक्टिव्हिटी’चा पर्याय.. अशा अनेक प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. रस्ते, वीज, पाणी, रोजगार निर्मिती, शेती व पूरक उद्योग, पर्यटन, कला व क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. पंतप्रधान सहायता निधीतुन मतदारसंघातील १५ जणांना २० लाखाची मदत मिळवून दिली.

छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस<br />नाशिकच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल आपण अतिशय समाधानी आहोत. सर्व प्रश्नांना ते योग्य न्याय देत आहेत. नाशिकचा आवाज लोकसभेत बुलंद होत आहे. नाशिककरांच्या सर्व अपेक्षा ते पूर्ण करत आहेत. ज्ल्ष्टिद्धr(३९)ाात वर्षभरात अनेक सुधारणा होऊ लागल्या आहेत. नागरिकांची इच्छा पूर्ण होत आहे. यापेक्षा अजून वेगळे काय ?

हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) दिंडोरी

विजयाची हॅटट्रिक, पण प्रश्न ‘जैसे थे’
विजयाची ‘हॅटट्रीक’ साधणाऱ्या खासदारांना खरेतर मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, ती अद्याप फळास आलेली नाही. प्रारंभीचे काही महिने त्याकरीता व्यूहरचना करण्यात गेले. मतदारसंघातील प्रदीर्घ काळापासून रखडलेले प्रश्न ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. कांद्याची जिवनावश्यक वस्तुंच्या यादीतुन सुटका झाली नाही की, सिंहस्थासाठी केंद्राने भरीव मदत दिली नाही. निवडणुकीत विजयासाठी मोठय़ा कामांपेक्षा सर्वपक्षीयांशी स्नेहाचे संबंध, मितभाषी स्वभाव हे कामात येत असल्याचे त्यांना चांगलेच उमगले आहे. निवडून आल्यानंतर नांदगाव, येवला व चांदवडसारख्या भागात खासदारांनी फारसा संपर्क ठेवला नसल्याची ओरड होत आहे. खासदारांचे निवासस्थान नाशिकला असल्याने भेट घ्यायची असेल तरी मतदारांना नाशिक गाठावे लागते. रेल्वे मार्ग सर्वेक्षण, मुंबई-आग्रा महामार्गावर तीन ठिकाणी भुयारी मार्गाला मंजुरी ही त्यांची जमेची बाब. मात्र एखादा नवीन प्रकल्प मतदार संघात येईल हे दूर, पाण्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नही मार्गी लागलेले नाहीत.

नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्ग मंजुरीसाठी पाठपुरावा तसेच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ओझर, वडाळीभोई व उमराणे येथे भुयारी मार्ग मंजूर करण्यात यश. मनमाड-धुळे-इंदूर आणि नाशिक-सूरत रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला सततच्या पाठपुराव्यामुळे मान्यता. ओझर विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्यासाठी प्रवासी इमारतीचे राज्य शासनाकडून एचएएलकडे हस्तांतरण केले. कांद्याला जिवनावश्यक वस्तुंच्या यादीतून बाहेर काढावे आणि त्याची किफायतशीर किंमत निश्चित करणे, सिंहस्थासाठी अतिरिक्त निधी, प्रत्येक राज्यात एनडीआरएफचे केंद्र स्थापन करणे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टरची खरेदी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन, आदी विषयांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
सिंहस्थाच्या दृष्टीने मतदार संघात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची सुवर्ण संधी होती. मात्र, ती गमावली गेली. सिंहस्थाच्या अनुषंगाने काही भरीव कामे नाशिकमध्ये झाल्याचे दृष्टीपथास पडत नाही. कृषिप्रधान दिंडोरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या वा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. आपदग्रस्तांना लवकर मदत मिळत नाही. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राकडून मदत मिळविता येईल. पण, तसा पाठपुरावा खासदारांनी केला नाही. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याच्या विषयात खासदारांनी आपली भूमिकाही मांडली नाही. यामुळे दिंडोरी मतदारसंघात अद्याप ‘अच्छे दिन’ दूरच आहेत. प्रचारात दाखविलेले स्वप्न निव्वळ दिवास्वप्न ठरले.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Performance review of maharashtra mp
First published on: 20-05-2015 at 08:21 IST