महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवासुविधांची तपासणी आतापर्यंत केली जात होती. मात्र, यापुढे स्थापत्यविषयक कामांच्या दर्जाची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी दक्षता पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी आयुक्तांनी सात कलमी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. तपासणी, स्पर्धा, माहिती, विकासाचा नियोजन आराखडा, ई गव्हर्नन्स, क्षमता बांधणी, धोरणे असा हा कार्यक्रम आयुक्तांनी यापूर्वीच जाहीर केला होता. त्यात ई ऑफिस, कार्यालयीन सुधारणा, दक्षता व नियंत्रण कक्ष या तीन मुद्दय़ांची आयुक्तांनी नव्याने भर घातली आहे.  आयुक्त म्हणाले, स्थापत्य कामे करताना निकष पाळले जात आहेत का, दर्जा राखण्यात येत आहे का, मूळ खर्च व वाढीव खर्चाचे प्रमाण कसे आहे, याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी दक्षता पथक काम करणार आहे. शासकीय कामात संगणकाचा वापर वाढला असून भविष्यात सर्वत्र त्याची गरज लागणार आहे. त्यानुसार पालिकेत टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करण्यात येणार आहे. फाईलींचा प्रवास संगणकावर सुरू झाल्यास वेळ वाचेल तसेच वेग व सुरक्षितताही वाढेल. ‘एलबीटी’ चे काम सुरुवातीपासूनच संगणकावर सुरू करण्यात येणार आहे. कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देताना कामासाठी आलेल्या नागरिकांना आवश्यक गोष्टी मिळाव्यात, याचा प्रयत्न केला जाणार आहे. पालिकेत दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. पाण्याचा पुनर्वापर, वीजबचत, प्लाटिकचा वापर टाळणे अशा गोष्टी करण्यात येणार आहेत. महापालिका दुसऱ्याला जे सांगते, ते स्वत: करण्याची तयारीही ठेवली पाहिजे, असे आयुक्त म्हणाले.
‘ई टेंडिरग’ मुळे १०० कोटींचा फायदा
िपपरी महापालिकेच्या वतीने विकासकामांसाठी निविदा काढताना ई-टेंडिरग पध्दतीचा अवलंब सुरू झाला, तेव्हा त्यास तीव्र विरोध झाला होता. मात्र, या पध्दतीमुळे वर्षभरात पालिकेला १०० कोटींचा फायदा झाल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.