वन विभागाच्या भात्यात ‘न्युमॅटीक ट्रॅक्विलायझर गन’

नाशिक व नगर जिल्ह्यात बिबटय़ांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत राहिलेली ‘न्युमॅटीक ट्रॅक्विलायझर गन’ अखेर वन विभागाच्या भात्यात समाविष्ट

* पाच नवीन बचाव पथकांचा प्रस्ताव
*    बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी आता भक्कम तटबंदी
नाशिक व नगर जिल्ह्यात बिबटय़ांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत राहिलेली ‘न्युमॅटीक ट्रॅक्विलायझर गन’ अखेर वन विभागाच्या भात्यात समाविष्ट झाली आहे. नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ाला बेशुद्ध करण्यासाठी तिचा प्रामुख्याने वापर होईल. नऊ लाख रूपये किंमतीच्या दोन वैशिष्ठय़पूर्ण बंदुका जर्मनी व फ्रान्स येथून मागविण्यात आल्या आहेत. या बरोबर बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आणखी पाच नवीन बचाव पथके स्थापण्याची तयारीही वन्यजीव संरक्षण विभागाने सुरू केली आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबटय़ांचे हल्ले व संचार वाढत असून त्याच्या हल्ल्यात काही जणांना प्राणही गमवावे लागले आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता निफाड, येवला व सिन्नर तर नगरमधील अकोले, संगमनेर, पारनेर व पाथर्डी हे तालुके या संदर्भात संवेदनशील मानले जातात. या परिसरात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने साहजिकच बिबटय़ांचे ते अधीवास क्षेत्र बनले. परंतु, त्यांची त्या त्या भागातील वाढती संख्या स्थानिकांच्या जीवावर बेतण्यास कारक ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर, नाशिक वनवृत्तात समाविष्ट असणाऱ्या उपविभागात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण १० बचाव पथके स्थापन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी जी साधन सामग्री आवश्यक ठरते, ती प्रत्येक पथकासाठी उपलब्ध करण्यात आली. ही पथके स्थापन करण्यामागे नागरी वसाहतीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाला शक्य तितक्या लवकर पकडण्याची कार्यवाही करता यावी, हा एकमेव उद्देश. त्या अंतर्गत आता टॅक्विलायझर गन खरेदीच्या निमित्ताने  महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
नागरी भागात शिरलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग पिंजरा उभा करून जाळे लावते. परंतु, बिबटय़ा क्वचितच  त्यात अडकतो. त्यासाठी बरीच कसरत आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी न्युमॅटीक ट्रॅक्विलायझर गन सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या बंदुकीच्या सहाय्याने इंजेक्शनचा मारा करून वन्यप्राण्याला काही कालावधीसाठी बेशुद्ध केले जाते. या वैशिष्ठय़पूर्ण बंदुकीचे महत्व लक्षात घेऊन मागील सात ते आठ वर्षांपासून ती खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
या स्वरूपाची बंदूक परदेशातून आयात करावी लागते. त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष परवानगी मिळवून या दोन बंदुका खरेदी करण्यात आल्याचे वन्यजीव संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. प्रत्येकी साडे चार लाख याप्रमाणे एकूण नऊ लाख रूपये त्यावर खर्च करण्यात आले. लवकरच ती चालविण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. नाशिक वनवृत्तात पूर्व नाशिक, मालेगाव उपविभाग, पश्चिम नाशिक, अहमदनगर व संगमनेर उपविभाग यांचा समावेश होतो. या संपूर्ण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत उपद्रव घालणारे ७२ बिबटे व चार पछडय़ांना पकडण्यात आले. वैद्यकीय उपचार व त्यांची ओळख पटविण्यासाठी ‘चीप’ बसविण्याची प्रक्रिया झाल्यावर त्यांना दूर अंतरावरील जंगलात सोडण्यात आले. बिबटय़ांचा वाढता वावर लक्षात घेऊन त्यांना पकडण्यासाठी आणखी पाच बचाव पथके स्थापन करण्याचा प्रस्ताव वन विभागाच्या मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. या वर्षभरात ही पथके स्थापन केली जाणार असून त्यांची एकूण संख्या १५ वर पोहोचणार आहे.

ब्लो पाइप व गनमधील फरक
बिबटय़ासह वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी आजतागायत ‘ब्लो पाइप’चा वापर केला जात होता. परंतु, या पाइपला काही मर्यादा आहेत. म्हणजे, पिंजऱ्यात जेरबंद वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. अपदावात्मक परिस्थितीतो बाहेर फिरणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद करताना त्याचा उपयोग होतो. ब्लो पाइपची कार्यपद्धती गनसारखीच असली तरी पाइपमध्ये फुंकर मारून इंजेक्शन मारावे लागते. टॅक्विलायझर गनच्या तुलनेत त्यांची मारक क्षमता अतिशय कमी असते. गनची मारक क्षमता ५० ते ७५ फूट असल्यामुळे वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी ती अधिक प्रभावी ठरते. मोकळ्या भागात फिरणाऱ्या वन्यप्राण्यांवर तिचा सहजतेने वापर करता येतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pneumatic tranquilizer gun to forest department