मुंबईत अनैतिक देहव्यापार करण्याचा धंदा जोरात सुरू असून समाजसेवा शाखेने त्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. चालू वर्षांच्या तीन महिन्यांत पोलिसांनी देहव्यापार विक्रीचे ३० गुन्हे दाखल करून ५८ जणांना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलींना आणि तरुणींना फसवून मुंबईत आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो. मायानगरी मुंबईत हा व्यवसाय जागोजागी सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने या व्यवसायाविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षांत १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१५ या वर्षांत देहव्यापाऱ्याच्या धंद्यावर पोलिसांनी एकून ३० ठिकाणी कारवाई करून ५८ आरोपींना अटक केली आहे. गेल्या वर्षी २०१४ मध्ये हेच प्रमाण २३ एवढं होतं.
अनेक राज्यांतून गरीब मुलींना नोकरीच्या आमिषाने फसवून आणि प्रेमाच्या जाळ्याच अडकवून मुंबईत आणले जाते. मग त्यांना फसवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. त्यांचा परतीचा मार्ग नसतो त्यामुळे ते याच ठिकाणी अडकतात आणि नाईलाजाने हा व्यवसाय करतात असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही अशा व्यवसायांची माहिती मिळाली की बोगस गिऱ्हाईक पाठवून खातरजमा करतो आणि मग सापळा लावून छापा घालतो असे त्यांनी सांगितले. अनेक स्वयंसेवी संस्थादेखील पोलिसांना या व्यवसायाबाबत माहिती देतात. उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये प्रथितयश मॉडेल्सदेखील देहविक्रीच्या व्यवसायात असतात. मुंबईच्या पश्चिम उपनगरात हे प्रमाण जास्त असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 अनेक वर्तमानपत्रांत आणि संकेतस्थळांवर सुंदर मुलींचे फोटो दाखवून देहविक्रीचा व्यावसाय केला जातो. त्या सुंदर मुलींचे फोटो पाहून आणि त्यांच्याशी बोलून ग्राहक त्या जाहिरातींना बळी पडतात, पण प्रत्यक्षात त्यांची फसवणूक केली जाते. त्यांना त्या मुलींऐवजी कुंटणखान्यातल्या मुली पुरवल्या जातात. मात्र हे ग्राहक तक्रार करू शकत नसल्याने त्यांचे फावते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action against sex racket
First published on: 11-04-2015 at 12:05 IST