महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणी अॅड. उदयसिंह पाटील यांच्या पोलीस कोठडीत कराड न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. शेख  यांनी ९ फेब्रुवारीपर्यंत वाढ सुनावली. फिर्यादी सरकार पक्षातर्फे या खून प्रकरणाच्या आणखी तपासासाठी उदयसिंह पाटील यांना ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावर बचावपक्षातर्फेही युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्या. शेख यांनी उदयसिंह पाटील यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.  
अॅड. उदयसिंह पाटील कराड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र असल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, अॅड. उदयसिंह पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालय परिसरानजीकचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. न्यायालय परिसराबाहेर उंडाळकर समर्थकांनी गर्दी केली होती. पहिलवान संजय पाटील खून प्रकरणाचा सध्या जादा तपास अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे करीत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी उदयसिंह पाटील यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज न्या. शेख यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले.  
तपासादरम्यान, उदयसिंह पाटील यांच्या राहत्या घरी एक जर्मन बनावटीचे पिस्तूल त्यांनी काढून दिले आहे. या पिस्तूलच्या लायसनवर १५ काडतुसे खरेदी केलेल्याची नोंद असून, उर्वरित काडतुसांची खरेदी, काडतुसाच्या काही रिकाम्या पुंगळय़ा या बद्दल समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. तसेच खुनासाठी वापरलेल्या पिस्तुलातील काडतुसे यांचा काही संबंध आहे का, याचा तपास करणे आवश्यक असल्याने आरोपीच्या पोलीस कोठडीत ७ दिवसांची वाढ व्हावी अशी मागणी न्या. शेख यांच्याकडे फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली.  
बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅड. एम. टी. यादव यांनी सदर पिस्तुलाचा परवाना उदयसिंह पाटील यांच्याकडे आहे. खुनासाठी वापरलेली हत्यारे कोर्टात याआधीच सादर केली आहेत. त्यामुळे या परवाना असलेल्या पिस्तुलाचा अधिक तपास होणे आवश्यक नसल्याचे सांगितले. तर, खुनानंतरच्या न्यायमोर्चामध्ये उदयसिंह पाटील व त्यांचे वडील आमदार विलासराव पाटील यांचेबद्दल अपशब्दांचा वापर केला गेला होता. त्यामुळे मोर्चाच्या विरोधात अब्रुनुकसानकीचा दावा दाखल करण्याच्या हेतूने मोर्चाची सीडी पाटील यांनी स्वत:कडे ठेवल्याचे अॅड. यादव यांनी सांगितले.
फिर्यादी सरकार पक्षाचे वकील अॅड. राजेश मडके यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, उदयसिंह पाटील यांचे सातारा व कराड येथील घराची झडतीदरम्यान, आरोपीच्या दैनंदिन वापरातील पासबुक, चेकबुक, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड यापैकी एकही मिळून आले नाही. यामधून आरोपीने कधी व कोठून पैशांची देवघेव केली याबाबत अधिक तपास होणे गरजेचे आहे. आरोपीचा पासपोर्ट, गुन्ह्याच्या वेळचा मोबाईल हॅन्डसेट, सीमकार्ड, मेमरीकार्ड सापडले नसून, आरोपीने कोठेतरी ते लपवून ठेवले असण्याची शक्यता असून, या सर्व गोष्टी हस्तगत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.