आलेश बोरखडे हत्याकांडातील मुख्य आरोपी शिवशंकर पटेल यास टोळीविरोधी पथकाने गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १९ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. बोरखडे हत्याकांडाचे धागेदोरे हाती लागण्यासाठी व इतर सहकाऱ्यांची नावे उघड होण्याकरिता पोलिसांना पुरेसा अवधी मिळावा, याचा विचार करून शिवशंकर पटेल यास १९ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आलेश बोरखडेचा तलवारीचे वार करून त्याच्या शरीराची खांडोळी करून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.  खंडणीच्या कारणावरून आलेशचा सुरक्षा रक्षक असलेल्या शिवशंकर पटेल याने खून केला होता आणि त्याचा मृतदेह पोत्यात टाकून मध्यप्रदेशातील एका जंगलात फेकून पेट्रोल टाकून जाळून टाकला होता.
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि शिवशंकर पटेल याच्याशिवाय या खून प्रकरणात दोषी असलेल्यांना अटक व्हावी, अशी मागणी आलेश बोरखडेच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.