फसवणूक केल्यासंबंधी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर कारवाई करू नये, यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांना मंगळवारी दुपारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार कैलास अवघडे यांच्या विरोधात फसवणुकीच्या तक्रारीचा अर्ज ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे आला होता. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करू नये तसेच यासंबंधीची कारवाई करू नये, यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी कैलास यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, या संदर्भात कैलास यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलीस उप अधीक्षक ममता डिसोजा, पोलीस निरीक्षक अरुण सपकाळ यांच्या पथकाने वागळे इस्टेट भागातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून शेजवळ यांना एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.