पावणेचार लाख रुपयांच्या सोयाबीन चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, धुळे येथील एका व्यापा-याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे सोयाबीन चोरांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शहरातील व्यापारी संजय भाऊसाहेब गाडेकर यांनी धुळे येथील संजय सोया या कंपनीला १०० पोती सोयाबीन पाठविली होती. पण मालमोटार चालकाने कंपनीत माल न पाठवता त्याची परस्पर विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सपकाळे व पोलीस उपनिरीक्षक अनिल भिसे यांनी याप्रकरणाचा तपास करुन व्यापा-याला अटक केली.
गाडेकर यांनी पाठविलेला माल मालमोटारीचा चालक सुनील काशिराम वराडे याने पंकज मदनलाल अग्रवाल (वय ३५, राहणार धुळे) याच्यामार्फत दिसान अ‍ॅग्रो या कंपनीला विकला. अग्रवाल यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अद्याप मालमोटारीच्या चालकाचा तपास लागलेला नाही.
धुळे येथील टोलनाक्यावरून तसेच मोबाइल वापराच्या आधारे या गुन्ह्याचा तपास पोलिसांना लागला आहे.