नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन पाच दिवस झाले असले तरी त्यांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फलक हटवण्यासाठी ना भाजपा कार्यकर्त्यांना वेळ मिळाला आहे, ना महापालिकेच्या परवाना विभागाला..! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि पालिका प्रशासनात चढाओढ सुरू असतानाच शहर विद्रुप करणाऱ्या या फलकांकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच स्वत:हून दखल घेत हे फलक काढून टाकण्याची कारवाई केली तरच मुंबईकरांच्या होर्डिग्जमुक्त शहराचे स्वप्न साकारू शकेल.
शहरातील अनधिकृत होर्डिग्ज काढण्यासाठी पालिकेच्या परवाना विभागाकडून सातत्याने कारवाई केल्याचे दाखवले जाते. मात्र अनेकदा उच्च न्यायालयाने कान टोचूनही पालिकेला शहर होर्डिग्जमुक्त करता आलेले नाही. निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांनी शहरभर अनधिकृत भित्तीचित्रे, होर्डिग्ज लावू नयेत यासाठी पालिकेकडून कारवाई करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात पालिकेने राजकीय पक्षांच्या १२३६ होर्डिग्ज, भित्तीचित्रांवर कारवाई केली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात ही कारवाई ढेपाळली. शहराला विद्रुप करणारी अवघी ५२१ राजकीय होर्डिग्ज काढण्यात आली. मात्र या होर्डिग्जमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यालयासमोर लावलेल्या मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन करणाऱ्या एकाही होिर्डगचा समावेश नाही. एअर इंडिया, एलआयसीची मुख्य कार्यालये असलेल्या, गजबजलेल्या नरिमन पॉइंट परिसरातील ही होर्डिग्ज पालिका अधिकाऱ्यांना कशी दिसत नाहीत, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव २८ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले आणि मंत्रालयाच्या जवळच असलेल्या या परिसरात अक्षरश: प्रत्येक झाड, बसस्टॉप, विजेचे खांब येथे अभीष्टचिंतनाची भलीमोठी होर्डिग्ज लागली. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी मागे पडायला नको, या भावनेने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली. मुख्यमंत्रीपदाचा सोहळा पार पडून पाच दिवस उलटल्यावरही ही सर्व अनधिकृत होर्डिग्ज कायम आहेत.
मुख्यमंत्रीनिवडीनंतर फटाक्यांच्या माळा फोडून भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला होता. हा कचरा कार्यकर्त्यांनीच रात्री उचलला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा वसा जोपासला. मात्र याच भाजपा कार्यकर्त्यांना ही होर्डिग्ज काढण्याचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही. पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानासाठी कंबर कसलेल्या पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही शहर विद्रुप करणारी ही होर्डिग्ज दिसलेली नाहीत. पंतप्रधानांनी किमानपक्षी मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत होर्डिग्जविरोधात हाक दिल्यावरच ही होर्डिग्ज काढली जाणार का, असा प्रश्न इथून नियमित ये- जा करणाऱ्यांच्या मनात उमटत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
पालिकेला ही होर्डिंग्ज दिसत नाहीत का?
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन पाच दिवस झाले असले तरी त्यांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फलक हटवण्यासाठी ना भाजपा कार्यकर्त्यांना वेळ मिळाला आहे, ना महापालिकेच्या परवाना विभागाला..! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि पालिका प्रशासनात चढाओढ सुरू असतानाच शहर विद्रुप करणाऱ्या या फलकांकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे.
First published on: 05-11-2014 at 07:10 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political hoarding all over mumbai