अकरावीची महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरळित होण्यासाठी तीन वर्षांपासून क्रेंद्रीय पद्धतीनुसार प्रवेश प्रकिया सुरू आहे. गुणवत्तेनुसार सुरू असणाऱ्या या प्रवेशपद्धतीनुसार कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयामध्ये नंबर लागेल की नाही याची भीती असल्याने व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये धावाधाव सुरू केली आहे. यासाठी नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी महाविद्यालयावर शब्द टाकताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील महविद्यालयात लोकप्रतिनिधींना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थापन कोटय़ातून अ‍ॅडमिशन घेण्यासाठी ताटकळत महाविद्यालयात उभे राहवे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पालक वर्गातूनही, कितीही घ्या पण आम्हाला प्रवेश द्या म्हणून देणगी प्रकाराला खतपाणी घातले जात आहे. अकरावीतील प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण खात्याच्या वतीने प्राप्त अर्ज, मंजूर तुकडय़ा व क्षमता यांचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येते. त्यानुसार प्रवेश प्रकिया चालते.
प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांना हवी असलेली शाखा निवडून त्यांच्या पंसतीक्रमानुसार महाविद्यालयाचा क्रम टाकवयाचा असतो. काही
विद्यार्थ्यांनी पाच महाविद्यालयांचे क्रम दिले होते. त्यामुळे केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले असतानादेखील घरापासून जवळच किंवा अमुक एक नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरू करत आहेत. ८० टक्के प्रवेश केंद्रीय पद्धतीनुसार व २० टक्के प्रवेश व्यवस्थापन कोटय़ातून अशी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही त्यांना याच २० टक्के व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश देण्यासाठी महाविद्यालयात पालकांची आणि विद्यार्थ्यांची  चढाओढ सुरू आहे.
प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उच्चभ्रू पालक सर्व ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मग पालक भरघोस देणगी देण्यासाठी हात सैल सोडत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचे फावले असून सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांचे देणगीची रक्कम ऐकून  डोळे पांढरे होत आहेत.