प्रत्येक पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्यामुळे बहुतेकांना उमेदवारीची संधी प्राप्त झाली असली तरी तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. माघारीसाठी बुधवार शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी बंडोबांना शांत करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. ज्या मतदारसंघात प्रबळ असे काही उमेदवार आहेत, त्यांच्या माघारीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मनधरणी केली जात आहे. कोणकोणत्या मतदारसंघात त्यास कितपत यश मिळाले ते माघारीची मुदत संपुष्टात आल्यावर स्पष्ट होईल.
आघाडी व महायुतीमध्ये अखेरच्या क्षणी बिघाडी झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांची सर्व जागांवर उमेदवार उभे करताना चांगलीच दमछाक झाली. ऐनवेळी इच्छुकांना डावलून पक्षातील दुसऱ्याला अथवा बाहेरून आलेल्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली गेल्याने अनेक जण नाराज झाले. यामुळे अनेक मतदारसंघात नाराजांनी अपक्ष उमेदवारी करत बंडाचे निशाण फडकावले आहे. बंडखोर व अपक्षांची संख्या इतकी वाढली की, प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची रेलचेल दिसते. बुधवार हा उमेदवारी मागे घेण्यासाठी अंतिम दिवस आहे. आधीच सर्व पक्ष स्वतंत्ररीत्या लढत असताना त्यात बंडाळीचा फटका बसू नये असा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच अपक्षांची संख्याही मोठी असल्याने कोणत्या उमेदवाराचा आपल्या मतावर परिणाम होईल याची छाननी केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात छाननीअंती २५८ उमेदवार मैदानात आहेत. त्यात नांदगाव मतदारसंघात २९, मालेगाव मध्य १७, मालेगाव बाह्य ११, बागलाण १८, कळवण ८, चांदवड १२, येवला १७, सिन्नर ७, निफाड ११, दिंडोरी १५, नाशिक पूर्व २३, नाशिक मध्य १७, नाशिक पश्चिम २२, देवळाली ३१, इगतपुरी २० उमेदवारांचा समावेश आहे. बंडखोर व अपक्षांचे अनेक मतदारसंघात उदंड पीक आले आहे. नाशिक पश्चिममधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिवसेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी हे रिंगणात उतरले आहेत. नाशिक पूर्व व देवळाली येथेही अनेकांनी अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकले आहेत. बंडखोर व प्रबळ अपक्षांमुळे मत विभागणी टाळण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांची समजूत काढली जात आहे. अपक्षांना उमेदवारी मागे घेण्यासाठी राजी केले जात आहे. माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर बंडोबा शांत झाले की नाही याचे चित्र स्पष्ट होईल.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
बंडोबांना शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
प्रत्येक पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्यामुळे बहुतेकांना उमेदवारीची संधी प्राप्त झाली असली तरी तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. माघारीसाठी बुधवार शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी बंडोबांना शांत करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.

First published on: 01-10-2014 at 08:59 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political parties are trying to stop rebel candidates