शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला असून येथील जुन्या इन्कमटॅक्स चौकात याचे जाहीर प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांना झाल्याने सर्वानी तीव्र खेद व्यक्त केला. शिवसेनेतील अंतर्गत वाद इतका विकोपाला पोहोचला की, माजी महिला पदाधिकाऱ्याला अस्थिकलशाच्या गाडीसमोर आडवे व्हावे लागले. याची गंभीर दखल पक्ष निरीक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी घेतल्याची माहिती मिळाली.
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयातून फुलांनी सजविलेल्या ट्रकवरून शहरातील रतनलाल प्लॉट, जठारपेठ, जवाहर नगर, गौरक्षण रोड, इन्कमट्रॅक्स चौक मार्गाने नेण्यात आला. शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकारी ज्या पक्षापासून गेल्या काही वर्षांंपासून दूर आहेत त्यांनी या अस्थिकलशाच्या ट्रकवर चढण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कट्टर शिवसैनिकांच्या पचनी पडला नाही. शिवसेनेच्या माजी आमदारांनी शिवसैनिकांची भावना लक्षात घेऊन या माजी महिला पदाधिकाऱ्याला यावेळी थेट माईकवरून चांगलेच खडसावले. जाहिरपणे अपमान झाल्याने या महिला पदाधिकाऱ्याने भरचौकात अस्थिकलशाच्या ट्रकसमोर आडवे होऊन तो समोर जाण्यास मज्जाव केला. शिवसैनिकांनी या माजी महिला पदाधिकाऱ्याला बळाचा वापर करत दूर केले. झालेला प्रकार अत्यंत दुदैवी असाच होता.
भररस्त्यावर अस्थिकलशाच्या दर्शनावरून रंगलेले हे नाटय़ इतर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनाही चांगलेच खटकले. माजी महिला पदाधिकारी शिवसेनेपासून दूर असताना त्यांनी पक्षात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, तसेच माजी आमदारांनीही दर्शनाच्या
मुद्यावरून वाद वाढविण्याची आवश्यकता नव्हती, असे मत शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
या सर्व घटनेमुळे अस्थिकलश दर्शनाच्या दु:खद व भावनिक प्रसंगाला वेगळे वळण लागल्याचा आरोप काहींनी केला. झालेली घटना दुदैवी असून याची जाणीव पक्षातील वरिष्ठांना देण्यात आली असून पक्ष निरीक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी याची गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व त्यावरून होणाऱ्या राजकारणाचे प्रदर्शन अकोलेकरांना झाले. अस्थिकलश दर्शनाच्या या
भावनिक कार्यक्रमात शिवसेनेतील अंतर्गत कलहाचे दर्शन उघडपणे झाले. आज शहरातील विविध भागात शिवसेना, भाजप व विविध सामाजिक संस्थांनी बाळासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले.