राजकारणाच्या पटावर कायम वावरणारे राजकारणी आम्हा अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगले अभिनेते असतात. एकाच वेळी अनेक व्यवधाने सांभाळणे त्यांना उत्तम प्रकारे जमते. मुख्यमंत्र्याची भूमिका साकारण्याच्या निमित्ताने नेत्यांची ही अभि‘नेते’गिरी खूप जवळून जाणवली, अशी कबुली ख्यातनाम अभिनेते सचिन खेडेकर यांनी दिली.
 ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ कार्यालयात झालेल्या गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अश्विनी भावे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखकद्वयींमधील प्रशांत दळवी, निर्माता संजय छाब्रिया आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की हेही उपस्थित होते. ‘राजकीय पक्षांची कार्यालये, मंत्रालय, मुख्यमंत्री निवासस्थान अशा ठिकाणी जाण्याची संधी कधी मिळाली नाही. परंतु, मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते ही व्यक्तिरेखा साकारताना मुख्यत्वे वृत्तवाहिन्यांवर विविध राज्यांचे मुख्यमंत्री कसे बोलतात, त्यांच्या लकबी, सदनात कसे वागतात, पत्रकारांसमोर ते कसे वागतात-बोलतात याचे निरीक्षण केले, असे सचिन खेडेकर यांनी स्पष्ट केले.
‘नायक’ या हिंदी सिनेमासारखाच हा सिनेमा असेल का या प्रश्नावर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, सर्वसामान्य माणूस एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो, असे दाखविले होते. त्याचा या चित्रपटाशी काहीच संबंध नाही. विश्वासराव मोहिते राजकारणात २५ वर्षे मुरलेला माणूस आहे. गेली काही वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या विश्वासराव मोहितेंच्या आयुष्यातील एक दिवस कसा आहे, त्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठका, घरचे वातावरण याचबरोबर एका रात्रीत घडणाऱ्या घडामोडी आणि एक नाटय़पूर्ण वळण चित्रपटात येते अशा पद्धतीने ‘आजचा दिवस माझा’मध्ये दाखविण्यात आले आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
लेखकद्वयींपैकी प्रशांत दळवी म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीची राजकीय इच्छाशक्ती किती आहे. मग तो काय करू शकतो हे दाखवायचा प्रयत्न केलाय. राजकारण्यामध्ये दडलेला माणूस दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खरे सांगायचे तर काही वर्षांपूर्वी चार-पाच मुख्यमंत्री जवळून पाहिलेल्या व्यक्तीने काही प्रकरणे गप्पांच्या ओघात सांगितली होती. ती ऐकल्यावर त्यात नाटय़पूर्ण हकीगत आणि चित्रपट आम्हाला दिसला असे प्रशांत दळवी व चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मुख्यमंत्र्याच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली आहे. चंद्रकांत कुलकर्णीसोबत अनेक वर्षांची ओळख आहे, कामही केले आहे. त्यामुळे त्यांनी भूमिकेविषयी विचारणा केल्यावर लगेचच होकार दिला. भूमिकेची लांबी किती आहे हा मुद्दा कधीच नव्हता. आपली भूमिका समरसून करायची आणि चंद्रकांत कुलकर्णी असल्यामुळे विश्वास होता की भूमिका कमी लांबीची असली तरी त्या व्यक्तिरेखेचे महत्त्व चित्रपटाच्या दृष्टीने खूप आहे, असे अश्विनी भावे यांनी मनमोकळेपणे सांगितले.