पोलिसांच्या धटींगणशाहीला राजाश्रय
ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठोकशाही आणि गुंडगिरीवर विजय मिळवल्याचे चित्र उभे करत शहरातील गल्लीबोळात पोस्टर लावून मोठय़ा जल्लोषात हा विजय साजरा करणाऱ्या शिवसेना-भाजपसह ठाण्यातील सर्व प्रमुख पक्षांनी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांच्यावर पोलीस ठाण्यात झालेल्या हल्ल्याविषयी पद्धतशीरपणे मौन धारण केल्याने खाकी वर्दीतील गुंडगिरीला लाभलेला राजाश्रय ठसठशीतपणे पुढे येऊ लागला आहे. सामाजिक चळवळींसाठी नेहमीच अग्रेसर राहिलेल्या ठाणे शहरात इंदुलकर यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे सर्वसामान्य ठाणेकरांमध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असे असताना एरवी लहानसहान प्रश्नांवर बंदसारख्या आंदोलनाचे हत्यार उगारून सर्वसामान्यांना वेठीस धरणारे शहरातील सर्व प्रमुख नेते यावेळी मात्र साधा ‘ब्र’ उच्चारण्याची िहमत दाखवू शकलेले नाहीत.
राजकीय नेत्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात सुरू असलेल्या दणदणाटाविरोधात आवाज उठविणाऱ्या प्रदीप इंदुलकरांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आपल्या शत्रूला मारहाण झाल्यासारखा आनंद काही राजकीय नेते व्यक्त करत आहेत, अशी प्रतिक्रिया शहरातील वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केली. ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राजन विचारे, एकनाथ िशदे, कॉँग्रेस नेते रवींद्र फाटक, मनोज िशदे, भाजप अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करत असताना न्यायालयाने आखून दिलेले नियमही पायदळी तुडविले जातात. पोलिसांच्या डोळ्यादेखत ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात असताना या धांगडिधग्याला पोलिसांचाही आशीर्वाद मिळतो. त्यामुळे याविषयी आवाज उठविणारे शहरातील सामाजिक वर्तुळातील कार्यकर्ते राजकीय नेते आणि पोलिसांना आपले शत्रू वाटू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया ‘जाग’ या सामाजिक संस्थेचे प्रमुख नितीन देशपांडे यांनी वृत्तान्तला दिली.
राजकीय नेत्यांचे मौन संतापजनक  
शहरातील सामाजिक चळवळीवर एकप्रकारे हल्ला होत असताना शहरातील एकाही राजकीय नेत्याने त्याविषयी प्रतिक्रिया नोंदवू नये हे संतापजनक आहे, असे मत समाजवादी जन परिषदेचे उन्मेश बागवे यांनी व्यक्त केले. ध्वनिप्रदूषणाविषयी सातत्याने आवाज उठविणारे इंदुलकरांचे कार्यकर्ते या शहरातील सामाजिक चळवळीचे अंग आहे. सामाजिक जाणिवा जागृत असलेले शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. असे असताना इंदुलकरांना मारहाण होऊनही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणाऱ्या राजकीय वर्तुळाला सामाजिक चळवळींचे अंग नकोसे झाल्यासारखे चित्र निर्माण होत आहे, असेही बागवे म्हणाले. कोपरी येथील एका पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर झुंडशाहीविरोधात विजय मिळवल्याबद्दल स्वतची पाठ थोपटवून घेणारे शिवसेनेचे नेते पोलिसांच्या दादागिरीविषयी मूग गिळून का बसले आहेत, अशी प्रतिक्रिया सचिन साळुंखे या लोकमान्यनगर येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांने व्यक्त केली. दूरचित्रवाणीवर मोठय़ा गप्पा मारणारे आणि एरवी सामाजिक जाणिवांविषयी घसा कोरडा करणाऱ्या ठरावीक नेत्यांची ‘शायिनग’ मुंब्य्रापुरतीच चालते का, असा सवाल अमर जाधव या वर्तकनगर येथील रहिवाशाने व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onठाणेThane
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politicians are mute on police beaten up social worker pradip indulkar
First published on: 06-09-2013 at 07:33 IST