मराठी माणसांचे प्रश्न हे प्रामुख्याने निवारा आणि रोजगाराशी निगडित आहेत. मराठी अस्मिता ही फक्त पक्षीय राजकारणासाठी वापरली गेली. मराठी माणसाचा खरोखरच विकास व्हावा, असे वाटत असेल तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच पातळीवर मराठी माणसाचे नेतृत्त्व करणारी सक्षम बिगर राजकीय संघटना हवी, असे मत मुंबई काँग्रेसचे माजी सरचिटणीस अजित सावंत तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा दिनानिमित्त ‘पार्ले पंचम’ या संस्थेतर्फे पार्ले टिळक महाविद्यालयात ‘मुंबईतून मराठी टक्का घसरतोय काय?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादात याव्यतिरिक्त शिवसेना नेते दिवाकर रावते, मनसेचे आमदार नीतीन सरदेसाई तसेच अ‍ॅड. किशोर जावळे सहभागी झाले होते. पत्रकार निशांत सरवणकर आणि नितीन चव्हाण यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
मराठी माणसाला व्यवसायात आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो स्वत: व्यवसाय न करता संबंधित व्यवसाय परप्रांतीयांच्या हवाली करतो, असे स्पष्ट करून रावते म्हणाले की. मराठी माणसाने स्वत:त विविध क्षेत्रात भक्कम पाय रोवण्यास शिकले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.