काहींचा अपवाद वगळता विदर्भात तरुण नेतृत्त्वाला राजकारणाची सूत्रे देण्यासाठी ज्येष्ठ नेते हळूहळू राजी होत असल्याचे चित्र आहे. काहींचे वारसदार राजकारणात स्थिरावले आहेत, काहींचे धडपडत आहेत तर काहींनी राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. या परिस्थितीत नवीन पिढीला राजकारणाचे धडे गिरवतानाच विदर्भातील तीव्र प्रश्नांची तेवढी जाण असली पाहिजे, याचा आग्रहदेखील वाढू लागला आहे.
दिवं. गंगाधराव फडणवीस यांचे पुत्र देवेंद्र फडणवीस यांनी अगदी नगरसेवकापासून सुरुवात करून थेट महापौरपदापर्यंत आणि नंतर आमदारकीपर्यंत मजल मारली. त्यांच्या झपाटय़ाने झालेल्या प्रगतीत त्यांचे प्रभावी वक्तृत्व आणि विदर्भातील समस्यांचा गाढा अभ्यास याचा सर्वाधिक वाटा आहे. प्रत्येक मुद्दय़ावर त्यांच्याकडे तपशीलवार माहिती आणि आकडेवारी तयार असते. यातून तरुण राजकारण्यांनी काही शिकण्याची गरज
आहे.
दिवं. भाऊसाहेब मुळक यांचे पुत्र राजेंद्र मुळक यांनीही स्वत:ची ‘अभ्यासू’ अशी प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले. राज्यमंत्री बनल्यानंतर अगदी तरुण वयातच मोठी खाती हाताळण्याच्या चालून आलेल्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग केला आहे. स्वत:ची कंप्युटर टेक्नॉलॉजीच त्यांनी स्वतंत्रपणे विकसित करून घेतली असल्याने मतदारसंघातील आकडेवारी एका क्लिकवर त्यांच्या लक्षात येते. फडणवीसदेखील ‘टेक्नोसॅव्ही’ आहेत कारण ‘टेक्नोसॅव्ही’चा जमाना असल्याने मुद्दे मांडण्यासाठी यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नवीन पिढीतील नेते करीत
आहेत.
नागपूरचे काँग्रेस खासदार विलास मुत्तेमवार यांनी विशाल मुत्तेमवारला सक्रिय केले आहे. मात्र, एखादी निवडणूक लढण्याइतपत विशालला सध्यातरी कुठेही संधी नाही. चार-दोन कार्यक्रमांच्या आयोजनापुरते त्याचे अस्तित्व आहे. काँग्रेसचे वर्धेचे खासदार दत्ता मेघेंचे पुत्र सागर मेघे भाजपात आले आमदार झाले पण, विधान परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे राजकारणातील स्वारस्य संपल्यागत स्थिती आहे. सागर मेघे शिक्षण संस्थांच्या कारभारात प्रचंड गुंतले आहेत. दुसरे पुत्र समीर मेघे यांना बँकिंग आणि सहकार क्षेत्रात रुची असल्याने त्यांनीही बँकिंगच्या व्यवसायात गुंतवून घेतले आहे. मंत्रिपद भूषविणाऱ्या अनिल देशमुखांनी आता सलीलला राष्ट्रवादीची नागपूर जिल्ह्य़ातील जबाबदारी देण्याच्या दृष्टीने पायाभरणी केली आहे. सलील सक्रिय असल्याने राजकीय उठाठेवीत त्यांचा अनेक ठिकाणी सहभाग दिसून येतो. परंतु, ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख यांचे राजकारणात काय झाले, याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे.
नागपुरात एक उल्लेख संदीप जोशींचा करावा लागेल. दिवं. आमदार दिवाकर जोशी यांचा वारसा चालवणाऱ्या धडाडीच्या संदीपने महापालिका कायदे आणि शहरातील प्रश्नांचा स्वत:चा एक डेटा तयार करून अभ्यासू नगरसेवक अशी प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले आहे.                      (क्रमश:)