महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतेपदावरून माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना डच्चू देण्यात आला असून, या प्रतिष्ठेच्या पदावर त्यांचेच शिष्य व माजी राज्याध्यक्ष संभाजीराव थोरात यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान, शिवाजीराव व त्यांचे पटशिष्य संभाजीरावांत चांगलेच जुंपण्याची चिन्हे असून, शिक्षक संघात उभ्या फुटीची शक्यता असल्याचा बोलबाला शिक्षक वर्गात सुरू आहे.  
इस्लामपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत संभाजीराव थोरातांच्या शिक्षकनेते पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या वेळी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. दरम्यान, शिवाजीराव पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, नेतानिवडीचे अधिकार जयंत पाटील यांना कोणी दिले. असा सवाल करीत माजी हकालपट्टी घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे. ११ ऑगस्ट रोजी लातूर येथे होणाऱ्या सभेत आपल्या लबाड शिष्याची अर्थात संभाजीराव थोरातांचीच अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली जाईल व नव्या अध्यक्षाची निवड होईल असा इशारा शिवाजीरावांनी दिला आहे.
गेली पाच वष्रे शिक्ष्क संघातील वाद चिघळल्यानंतर ओरोस येथे झालेल्या अधिवेशनात आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यात दिलजमाई झाली होती. थोरात यांनी राज्य शिक्षक संघाचे सलग १२ वष्रे अध्यक्ष वष्रे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे इस्लामपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. राज्य संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तांबटे, सरचिटणीस केशव जाधव, अंबादास वाझे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष प्रा. एस. डी. पाटील यांच्यासह सर्व जिल्हा संघाचे अध्यक्ष उपस्थित होते.
संभाजीराव थोरात म्हणाले, की सर्वाना विचारात घेऊन संघाची वाटचाल केली जाईल. तालुका बाहेर झालेल्या शिक्षकांच्या बदल्या, अप्रशिक्षित सेवानिवृत्तांचे निवृत्तिवेतन यासाठी प्रयत्न केले जाईल. या वेळी शिक्षक संघाचे जिल्हा नेते सिद्धेश्वर पुस्तके, मोहन जाधव, महेंद्र जानुगडे, रामचंद्र लावंड, पोपट कणसे, मच्छिंद्र मुळीक, राजेंद्र बोराटे, सदाशिव कदम, विठ्ठल निकम, समीर बागवान, नवनाथ बुरूगडे आदी उपस्थित होते.