ऐन उन्हाळाच्या दिवसांमध्ये महातिवरणकडून ऐरोली विभागामध्ये शुक्रवारी अचानक मान्सूनपूर्व कामासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याची पूर्वकल्पना ग्राहकांना नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागला.
उन्हाच्या जोराने अंगाची लाही लाही होत असताना, घेण्यात आलेल्या शार्ट डाऊनमुळे ऐरोलीकर पुरते हैराण झाले होते. ऐरोली परिसरात गेल्या आठवडय़ाभरापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. महावितरणच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा काढत रोष व्यक्त केला होता. यातच आता मान्सूनपूर्व कामाच्या दुरुस्तीच्या नावाखाली शुक्रवारी विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये अधिक रोष निर्माण झाला आहे. विद्युतपुरवठा बंद असल्याने उद्वाहक बंद असल्याने इमारतीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागला. शहरात महावितरणच्या वतीने टप्प्याटप्प्याने मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात येणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.