माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ६ जानेवारीपासून अमरावती जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या प्रथमच गृहजिल्ह्य़ाला भेट देणार आहेत. ६ ते १८ जानेवारीपर्यंत सलग १३ दिवसांचा त्यांचा हा मुक्काम आहे.
प्रतिभाताई पाटील यांचे ६ जानेवारीला पुण्याहून विमानाने नागपुरात सायंकाळी आगमन होणार आहे. रात्री त्या अमरावतीत काँग्रेस नगरातील ‘देवीसदन’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. ८ जानेवारीला त्या बडनेरा येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देणार आहेत. ११ जानेवारीला दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर (खल्लार) या सासरच्या मूळ गावी त्या भेट देणार आहेत. तब्बल दोन दिवस त्यांचा या गावात मुक्काम राहणार आहे. १४ जानेवारीला येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित आबासाहेब खेडकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाच्या प्रकाशन समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्थापनेच्या शताब्दी महोत्सव समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पांरपरिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक जागतिक परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. १८ जानेवारीला अचलपूर नगर परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमाचे त्या उद्घाटन करतील. त्यांच्या दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.